फोटो - वन विभागाने प्रसिद्ध केलेली हीच ती सन्मान पुस्तिका
वन बलप्रमुखांचा पुढाकार, कामांचे ठिकाणी महिलांचे हक्क व अधिकाराची मार्गदर्शक पुस्तिका जारी
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर वनविभागाने महिलांसाठी ‘सन्मान’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे वन बलप्रमुख पी. साईप्रसाद यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जाणार असून, महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे.
२५ मार्च २०२० रोजी दीपाली यांनी आत्महत्या केली होती. या घटनेने संपूर्ण वनविभागावर ताशेरे ओढण्यात आले. यादरम्यान धारणी पोलिसांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर फौजदारी कारवाईसह निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, एका महिला आरएफओला वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करावी लागली, हा डाग वनविभाग कदापिही पुसून काढू शकणार नाही, याचे शल्य वनविभागात कार्यरत महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना आहे. त्यांना बळ देण्यासाठी वन बलप्रमुख पी. साईप्रसाद यांनी ‘सन्मान’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे वनविभागात कर्तव्यावर असलेल्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती, सुरक्षित वातावरण आणि हक्काची जाणीव निर्माण करण्यात येणार आहे. जंगल, वन्यजीवांचे संरक्षणातही महिला अधिकारी, कर्मचारी आघाडीवर असून, आता अन्यायाविरुद्ध नव्या वाटा ‘सन्मान’ उपक्रमातून शोधण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
-------------------
या बाबीला असेल प्राधान्य
- केंद्र शासनाच्या महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमांची अंमलबजावणी
- वनविभागाच्या परिपत्रकानुसार महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण
- कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करणे
- महिलांना हक्काची जाणीव निर्माण करून देणे
- प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे
- महिलांना लागू असलेल्या विशेष रजा मंजूर करणे
--------------------
महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सशक्तीकरण आणि त्यांना समानता मिळवून देण्यासाठी ‘सन्मान’ उपक्रम राबविला जाणार आहे. या माध्यमातून महिलांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात येईल. वरिष्ठांकडे आलेल्या तक्रारीचा निपटारा करण्याासाठी विशेष कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
- पी. साईप्रसाद, वन बलप्रमुख, वनविभाग, नागपूर