- मोहन राऊतधामणगाव रेल्वे (अमरावती) - चांदूर रेल्वे पंचायत समिती स्तरावर राबविलेल्या ‘सन्मान प्रेरणेचा, सन्मान गुणवत्तेचा’ या उपक्रमाला राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरापूर्वी गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांनी या उपक्रमाकरिता घेतलेल्या परिश्रमाचे यामुळे चीज झाले आहे. खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा अव्वल असल्याचा अहवाल नुकताच असर संस्थेने सादर केला होता.त्यामागे ‘सन्मान प्रेरणेचा, सन्मान गुणवत्तेचा’ या उपक्रमाचा हातभार आहे. चांदूर रेल्वेचे गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांनी एक वर्षापूर्वी हा उपक्रम पंचायत समिती स्तरावर राबविला होता. तालुक्यातील ७४ शाळांमध्ये राबविलेल्या या उपक्रमाने तालुक्यातील शाळा अव्वल ठरल्या. यानंतर अमरावती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती जयंत देशमुख यांनी चिखलदरा येथील मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांच्या बैठकीत ही संकल्पना राबविण्याचे जिल्हा स्तरावर आवाहन केले होते. त्यानुसार हा उपक्रम प्रथम जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व पंचायत समित्यांच्या गटसाधन केंद्रांमार्फत राबविण्यात आला. आता हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. उपक्रमात शाळा पडताळणी करण्याकरिता अनेक भागांत गुण विभागण्यात आले. भौतिक गुणवत्ता, समाज सहभाग, व्यवस्थापन याकरिता वेगवेगळे गुण देण्यात आले. उत्तम मुख्याध्यापक, उत्तम शिक्षक असे विविध पुरस्कार निवडण्यात आले. एक वर्षाची माहिती संकलित करून असे पुरस्कार शाळा, केंद्र स्तरावर देण्यात आले आहेत. असे आहेत उपक्रमभौतिक सुविधेमध्ये लोकसहभागावर शाळेची रंगरंगोटी. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोणातून महत्त्वपूर्ण घटक समाविष्ट असणे. डिजिटल वर्गांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वापर करता येणे. वैज्ञानिक प्रयोगाकरिता साहित्य उपलब्धता. प्रयोगाचे सादरीकरण. गुणवत्तेमध्ये इयत्ता पहिलीसाठी बेरीज, दुसरीसाठी वजाबाकी, तिसरीसाठी गुणाकार, चौथीसाठी भागाकार तसेच परिसर अभ्यास; यामध्ये स्वत: कुटुंबाबद्दल माहिती सांगणे. कुटुंब, शाळा, गाव, महापुरुष, राष्ट्रीय सण, एक ऐतिहासिक घटना अशी माहिती विद्यार्थ्या$ंकडून घेणे.
चांदूरचे गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांनी राबविलेला हा उपक्रम जिल्ह्यानंतर राज्यात पोहोचला आहे. या उपक्रमामुळे जि.प. शाळांच्या गुणवत्तेत वाढ होईल.- जयंत देशमुख, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, अमरावती
चांदूर रेल्वे पॅटर्न आता राज्यभर राबविण्यात येणार आहे. हा गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे व आमचा सन्मान आहे. आमच्या जिल्हा परिषद शाळा यापुढे प्रगत शिक्षण देतील.ृ- अमोल पोळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती