कारवाईस विलंब : सहायक कामगार आयुक्तांशी चर्चा करणार पोलीस लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शासकीय कार्यालयाची दिशाभूल करून शॉप अॅक्टची नोंदणी करणाऱ्या अड्डा-२७ विरुद्धचे दस्तऐवज सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून कोतवाली पोलिसांना प्राप्त झाले आहेत. मात्र, कारवाई करण्यासाठी कोतवाली पोलीस "कन्फ्युज" असल्याचे आढळून येत आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी पोलीस आता सहायक कामगार आयुक्तांशी चर्चा करणार असून त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविणार आहेत. अड्डा २७ व कसबा या दोन्ही व्यापारी प्रतिष्ठानांच्या चालकांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाची दिशाभूल करून नोंदणी प्रमाणपत्र मिळविल्याचे उघड झाले होते. याच नोंदणी प्रमाणपत्राद्वारे चालकांनी हुक्का पार्लर संस्कृती अमरावतीत आणली. हुक्का पार्लर व्यवसायाआड त्याच ठिकाणी डॉन्स पार्लर सुरू असल्याचा आरोप बजरंग दलाने केल्याने खळबळ उडाली होती. तरुणाईला हुक्काचे व्यसन लावणाऱ्या पार्लरच्या चालकांविरुद्ध बजरंग दलाने सहायक कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार नोंदविली होती. त्यानुसार झालेल्या चौकशीत हुक्का पार्लरची नोंदणी ही अनधिकृत असल्याचे उघड झाले. त्यानुसार सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील शॉप अॅक्ट नोंदणी प्रमाणपत्रांचे काम सांभाळणाऱ्या दुकाने निरीक्षकांनी अड्डा-२७ व कसबा पार्लरविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविली. मात्र, ती तक्रार अपूर्ण असल्याचे पाहून दुकाने निरीक्षकांनी संबंधित प्रकरणाचे दस्तऐवज महाआॅनलाईनकडून मागवून पोलिसांकडे सादर केलीत. मात्र, या दस्तऐवजांच्या आधारेच गुन्हा दाखल करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या त्यामुळे तूर्तात ही कारवाई थंडबस्त्यात पडली आहे. यातील संभ्रम दूर करण्यासाठी पोलीस आता सहायक कामगार आयुक्तांशी चर्चा करून पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून हुक्का पार्लरसंबंधित दस्तऐवज प्राप्त झाले आहेत. मात्र, याच दस्तऐवजांच्या आधारे गुन्हा दाखल करणे उचित राहणार नाही. यासाठी सहायक कामगार आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येईल. - नीलिमा आरज, पोलीस निरीक्षक
हुक्का पार्लर : पोलीस "कन्फ्यूज्ड"
By admin | Published: June 19, 2017 12:14 AM