कोरोनाशी ग्रामीण भागातील आशा सेविका, गटप्रवर्तक दोन वर्षांपासून इमानेइतबारे दोन हात करीत आहेत. रुग्णांची माहिती, सर्वेक्षण व रुग्णालयात दाखल करण्याच्या कार्यात त्यांनी २४ तास झोकून दिले आहे. अशावेळी कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे. काही जणी व त्यांचे कुटुंबीय पॉझिटिव्ह होऊन मृत्यू झाला. मात्र, आजही आशा सेविकांच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष केले आहे.
कोरोना रुग्णांची तपासणी, लसीकरण कार्यक्रमात सहभाग, आजारी रुग्णांना दवाखान्यात दाखल करणे, कुटुंबाचे सर्वेक्षण करणे अशी विविध कामे शासन करून घेते, मात्र दोन हजार रुपये मानधन देण्यात येते. ३३ रुपये रोजात कुटुंब कसे चालणार, असा आशा सेविकांचा प्रश्न आहे. राज्य शासनाने दिलेले वाढीव मानधन अद्यापही मिळाले नाही. ३०० प्रतिदिन वेतन, मानधनाऐवजी शासनसेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी १५ जूनपासून राज्यभर संपाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आशा सेविका संघटनेच्या धामणगाव तालुकाध्यक्ष आशा ठाकरे, शुभांगी चौधरी, कविता धांदे, अर्चना राऊत यांनी दिली.