लोकमत न्यूज नेटवर्कनरेंद्र जावरेअमरावती : मेळघाटात अंधश्रद्धेतून उद्भवणाऱ्या अघोरी प्रथेला आठ महिन्यांचे बालक बळी पडले. पोटफुगीचा उपचार म्हणून त्याच्या पोटाला तप्त विळ्याचे चटके देण्यात आले. बोरदा गावात हा प्रकार बुधवारी सायंकाळी उघडकीस आला. या संतापजनक प्रकरणात काटकुंभ आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी संबंधित भूमका (मांत्रिक) विरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविली. पालकमंत्री तथा महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणात गंभीर दखल घेतली.राम संजू तोटा नामक या चिमुकल्यास पोटफुगीचा त्रास होता. नेहमीप्रमाणे होते तसे या प्रकरणातही रामच्या पालकांनी उपकेंद्र किंवा डॉक्टरांना न दाखविता त्याला गावातील भूमकाकडे नेले. या भूमकाने चुलीत तप्त केलेल्या विळ्याचे चटके त्याच्या संपूर्ण शरीरावर दिले. त्यामुळे पोटापासून मानेपर्यंत शरीर भाजले आहे. हा प्रकार तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती होताच काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील यांना कळविले. धारणीच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान यांनी तत्काळ आरोग्य अधिकाऱ्यांना बोरदा गावात पाठविले. त्या चिमुकल्यास तेथून चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. या कृत्याबद्दल चिखलदरा पोलीस ठाण्याच्या काटकुंभ पोलीस चौकीत वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी तक्रार दाखल केली.चिमुकल्या रामच्या पालकांनी उपचार करणाऱ्या भूमकाचे नाव सांगण्यास नकार दिल्याची माहिती आहे. त्यांचे मानाचे स्थान व त्यातून निर्माण झालेला दबदबा ही कारणे यामागे आहेत. यापूर्वीसुद्धा असेच प्रकरण उघडकीस आणणारे काटकुंभ येथील काँग्रेस पदाधिकारी पीयूष मालवीय यांनी भूमकाविरुद्ध महाराष्ट्र अंधश्रद्धा अधिनियमांतर्गत कारवाईची मागणी केली आहे.विधानसभेत गाजला होता मेळघाटचा डंबा‘लोकमत’ने ‘मेळघाटचा अघोरी डंबा’ सर्वप्रथम उघडकीस आणला होता. २०१५ मध्ये याच डंब्याची तत्कालीन आमदार तथा विद्यमान महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दखल घेऊन विधानसभेत तारांकित प्रश्न मांडला होता. तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मेळघाटातील या मांत्रिकांसाठी मानधन व प्राथमिक वैद्यकीय प्रशिक्षण देण्याचे जाहीर केले होते. परंतु, त्यानंतरही हा प्रकार सुरूच असल्याचे सदर घटनेने उघड केले. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी सकाळीच संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.चुरणी रुग्णालयात उपचारडॉ. अजय ठोसर, डॉ. मोनिका अठोले, परिचारिका स्मिता राऊत, आरोग्य सेवक सतीश तायडे, सुभाष ठाकरे, रामबाई तांडीलकर, चालक राहुल येवले, फुला कासदेकर, संतोष बेलकर आदींच्या पथकाने गुरुवारी दुपारी २ वाजता चिमुकल्याला ग्रामीण रुग्णालयात उपचार करीत दाखल केले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.बोरदा येथील आठ महिन्याच्या चिमुकल्याला पोटफुगीच्या उपचारासाठी भूमकाने तप्त विळ्याच्या डागण्या दिल्या. त्याला तत्काळ उपचारार्थ आणण्यात आले. पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे- आदित्य पाटील, वैद्यकीय अधिकारी, काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रमेळघाटातील हा गंभीर प्रकार आहे. त्याची मी स्वत: दखल घेतली आहे. आदिवासींनी असा जीवघेणा प्रकार करू नये, यासंदर्भात जनजागृती व त्यांना आरोग्यसेवेचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आदेश दिले आहेत. बाळावर उपचार होत आहेत.- यशोमती ठाकूर, महिला व बाल कल्याण मंत्रीबोरगाव येथील बालकाला चटके दिल्याच्या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली आहे. चौकशी आरंभली आहे.- आकाश शिंदे, ठाणेदार, चिखलदरा
अघोरी प्रकार! मेळघाटात चिमुकल्याला दिले तप्त विळ्याचे चटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 1:23 PM
राम संजू तोटा नामक या चिमुकल्यास पोटफुगीचा त्रास होता. रामच्या पालकांनी उपकेंद्र किंवा डॉक्टरांना न दाखविता त्याला गावातील भूमकाकडे नेले. या भूमकाने चुलीत तप्त केलेल्या विळ्याचे चटके त्याच्या संपूर्ण शरीरावर दिले.
ठळक मुद्देअघोरी प्रथा, डॉक्टरांची पोलिसांत तक्रार महिला-बाल कल्याण मंत्र्यांकडून गंभीर दखल