लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: घराबाहेर जाऊ देत नाही या कारणासाठी मोठ्या बहिणीने लहान भावावर बत्त्याचे अनेक वार करून त्याला ठार केल्याची घटना खोलापुरी गेट येथे घडली. या बहिणीला शुक्रवारी दुपारी सराफा परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने तिचे आईवडील सुन्न झाले आहेत.नीता (बदललेले नाव) हिला आपले आईवडील आपल्यापेक्षा लहान भावावरच जास्त प्रेम करतात असे नेहमी वाटत असायचे. तसे ती बोलूनही दाखवत असे व त्याविरुद्ध रोषही व्यक्त करत असे. मात्र तिच्या या बोलण्याकडे आईवडिलांनी फार गंभीरतेने विचार केला नाही.तिच्या या रागापायी तिने याआधीही घर सोडून जाण्याचे दोनदा प्रयत्न केले होते. आठच दिवसांआधी तिला पोलिसांनी घरी आणून सोडले होते. त्यामुळे त्यावर कायमची देखरेख ठेवली जात होती.गुरुवारी तिचे आईवडिल दोघेही घरी नसताना तिने पुन्हा घर सोडण्याचा निर्धार केला व बॅग भरायला घेतली. ते पाहून लहानशा भावाला पुढील कल्पना आली. त्याने ताई, तू जाऊ नको ना.. अशी प्रेमळ व आर्त विनवणी सुरु केली. त्याला न जुमानता ती घरातून निघू लागली. त्यावेळी लहानग्या भावाने असहाय्यपणे मदतीसाठी शेजाऱ्यांना आवाज दिला.. त्याने आरडाओरडा सुरू करताच संतापलेल्या बहिणीने जवळच पडलेला बत्ता उचलून त्याच्या डोक्यावर प्रहार करणे सुरू केले. बत्त्याच्या माराने त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले व तो खाली कोसळला. रक्ताने माखलेले कपड्यांनिशी तिने घरातून पळ काढला.रात्री ती अकोली रेल्वेस्थानकावर थांबली असता तेथे तिच्या परिचयाचा एक तरुण आला. त्याला तिने खोटी कहाणी सांगत रात्रभरासाठी आश्रय देण्याची विनंती केली. त्यानेही तिला आपल्या घरी नेले. सकाळी ही बातमी उघड होताच, त्याने तिला सराफा परिसरापर्यंत आणून सोडले.तिच्या या कृत्याने समाजमन व तिचे आईवडिल सुन्न झाले आहेत.
भीषण! ताई, तू घर सोडून जाऊ नकोस.. म्हणणाऱ्या भावाच्या डोक्यावर तिने घातले बत्त्याचे घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 9:42 AM