वरुड / पुसला (अमरावती) : वरुड - पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर महेंद्री विश्रामगृहानजीक वळण रस्त्यावर अज्ञात भरधाव रेतीच्या टिप्परने तीन युवकांच्या दुचाकीला १५ ते २० फुटांपर्यंत फरफटत नेले. या अपघातात दुचाकीस्वारांच्या अक्षरश: चिंधड्या होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळावर अत्यंत विदारक दृश्य होते.
पोलीस सूत्रांनुसार, मनोहर रामराव लांगापुरे (४०), किसन शिवनाथ लांगापुरे (३५) आणि राजेश रामदास शिंदे (५०, सर्व रा. अमडापूर) अशी मृतांची नावे आहेत. ते गावोगावी जाऊन भविष्य पाहण्याचा व्यवसाय करीत होते.
शुक्रवारी सकाळी ते अमडापूर येथून पांढुर्णाकडे जात होते. महेंद्री विश्रामगृहालगतच्या वळण रस्त्यावर रेतीने भरलेला भरधाव टिप्पर वरुडकडे जात होता. या टिप्परने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक मारली आणि सुमारे १५ ते २० फुटांपर्यंत दुचाकी फरफटत नेली. यामध्ये तिन्ही तरुणांच्या अक्षरश: चिंधड्या होऊन रक्तमांसाचा सडा रस्त्यावर पडला होता. दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच शेंदुरजनाघाट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनाकरिता आणण्यात आले.
तिन्ही युवकांचे मृतदेह रुग्णालयात आणताच नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार सतीश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कुंदन मुधोळकर, मोहन महाजनसह शेंदुरघाट पोलीस करीत आहे.
आरटीओचा वाहन तपासणी नाका हाकेच्या अंतरावर
घटनास्थळापासून दोन किमी. अंतरावर पुसला आरटीओ वाहन तपासणी नाका आहे. अपघातानंतर येथूनही चालकाने टिप्पर चालकाने टिप्पर पळविला कसा, हा प्रश्न अनुत्तरित आहे. परिवहन विभाग करतो तरी काय, अशी चर्चा आहे.