अमरावती : केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० लागू जाहीर केले आहे. हे नवे शैक्षणिक धोरण राज्यातही लागू करण्याचा निर्णय झाला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सीबीसीएस (चाईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम) अभ्यासक्रम लागू करुन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु केली. एवढेच नव्हे तर सर्व विद्या शाखा आणि सर्व विद्यार्थ्यांच्या हिवाळी २०२२ परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करणारे पहिले विद्यापीठ ठरले, हे विशेष.
राज्य शासनाच्या १६ ऑक्टोबर २०२० च्या निर्णयानुसार ‘सीबीसीएस’ पॅटर्न जून २०२३ च्या शैक्षणिक वर्षापासून लागू करणे अपेक्षित आहे. तथापि, कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या पुढाकाराने अमरावती विद्यापीठात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुहूर्तमेढ गतवर्षी २०२२ शैक्षणिक वर्षापासून रोवल्या गेली. अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात ४०४ महाविद्यालये, बुलढाणा येथील एक मॉडेल कॉलेज आणि अमरावती विद्यापीठाच्या शिक्षण विभागांतर्गत ३३ पीजी विभागात ‘सीबीसीएस ’ अभ्यासक्रम पॅटर्न लागू करण्यात आला आहे.
त्यानुसार हिवाळी- २०२२ परीक्षा २५ जानेवारीपासून घेण्यासंदर्भात वेळापत्रकही जाहीर केले आहे. बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या सीबीसीएस अभ्यासक्रमानुसार एकूण ६५ परीक्षा आणि ८५ हजार विद्यार्थी परीक्षा देतील, असे नियोजन केल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या प्रभारी संचालक मोनाली तोटे यांनी दिली आहे.
नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सुकाणू समिती
समितीच्या अध्यक्षपदी माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर हे तर सदस्य म्हणून माजी कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलगुरु डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, कुलगुरु डॉ. विलास सपकाळ, प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, माजी प्र-कुलगुरु डॉ. आर. डी. कुलकर्णी, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. अजय भामरे, सेवानिवृत्त प्राचार्य अनिल वार, प्रशांत मगर, श्रीधर जोशी, प्र-कुलगुरु डॉ. माधव एन. वेलिंग, कुलगुरू व्ही. एन. राजसेखरन पिल्लई आणि राज्याचे उच्च शिक्षण प्रभारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा समावेश आहे.