अमरावती : तुम्ही कॉलेजवयीन आहात, प्रेमात पडलाय, प्रेमालाप करायचाय, एकांत हवाय, तर ‘नो प्राॅब्लेम’. केवळ ३०० रुपये मोजा नि एकांत मिळवा. स्थळ : अमुक अमुक कॅफे. अट एकच तासाभरात काही ना काही मागवावे लागेल, अर्थात केवळ ३०० रुपये दिले म्हणजे बिनधास्त राहू नका. ऑर्डर देत राहा. प्रेमालाप करत राहा.
ही कुण्या कॅफेची जाहिरात नव्हे तर, काही विशिष्ट कॅफेधारकांनी प्रेमीयुगुलांसाठी केलेली खास व्यवस्था होय. अकोली रोडवरील एका कॅफेमधील अश्लील प्रेमालापाला कंटाळून तेथील स्थानिकांनी स्वत: पुढाकार घेत चार प्रेमीयुगुलांना रंगेहाथ पकडले. पोलिसांनादेखील पाचारण करण्यात आले. रविवारी सायंकाळच्या सुमारास ‘त्या’ कॅफेमधील प्रेमीयुगुलांच्या अश्लीलतेकडे झुकणाऱ्या कृत्याला पोलीस व स्थानिकांनी काही काळासाठी लगाम लावला. मात्र, अशा प्रकरणात पोलीस कारवाईला मर्यादा येतात. केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करून अशा जोडप्यांना सोडले जाते. मात्र, रविवारच्या या घटनेमुळे अशा ‘विशिष्ट’ कॅफेमधील ‘खास’ व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे.
गावोगावी, शहरोशहरी प्रेमीयुगुलांची काही कमी नाही. पण आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवण्यासाठी लागणाऱ्या एकांताच्या जागेची मात्र त्यांना कमतरता भासते आहे. त्यावर आता कुणीतरी म्हणेल, अमरावतीसारख्या शहरात छत्री तलाव, वडाळी तलाव आहे. बांबू गार्डन आहे. मालटेकडी आहे. शहरालगतचे हिरवेगार जंगल आहे. काहीच नाहीत, तर एक-दोन मॉल तर आहेतच आहेत. मग कसली आली कमतरता? हो, पण या जागांवर प्रेमीयुगुलांनी कितीही हक्क सांगितला तरी यातल्या काही ठिकाणी प्रेमीयुगुलांखेरीज एखादे कुटुंब, कॉलेजिअन्सचे ग्रुप, प्रौढ नागरिक असे कितीतरी लोक भटकत असतात. मग ही ठिकाणे प्रेमीयुगुलांसाठी एकांत कशी काय ठरू शकतात? त्यावर काहींनी शक्कल लढविली अन् पीक आले ते कॅफेचे. काही विशिष्ट कॅफेमध्ये ‘एकांत’ विकत दिला जातो अन् त्या मोबदल्यात प्रेमालाप करू देण्याची सवलत. त्यासाठी तेथे खास कंपार्टमेंट बनविण्यात आले आहेत. बसल्यावर डोके दिसू नये, इतक्या उंचीची त्या कंपार्टमेंटमध्ये २०० ते ३०० रुपये मोजून तासभर एकांत दिला जातो. कॅम्प, मोर्शी रोड, बडनेरा रोड अशा विविध ठिकाणच्या कॅफेमध्ये ही खास व्यवस्था करण्यात आली आहे.
‘त्या’ कॅफेचे लायसन्स रद्द?
अकोली स्थित एका कॅफेमध्ये गैरकृत्य चालत असल्याच्या निरीक्षणाअंती काही स्थानिकांनी तेथे आलेल्या तीन युगुलांना थांबवून ठेवले. कॅफेचालकाला जाब विचारला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधितांना पोलीस ठाण्यात नेत त्यांना समज देण्यात आली. त्या कॅफेचे लायसन्स रद्द करण्याचे प्रस्ताववजा पत्र पोलिसांकडून महापालिकेला पाठविला जाणार आहे.
कॅफे व तत्सम प्रतिष्ठानांना महापालिकेकडून परवाना दिला जातो. तक्रार आल्यास पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. तशी ती रविवारी घडलेल्या प्रकरणातदेखील करण्यात आली. महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याबाबत तडजोड नाहीच.
डॉ. आरती सिंह,
पोलीस आयुक्त