पान २ ची बॉटम
चांदूर बाजार : प्रधानमंत्री आवास योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे अनुदान न मिळाल्याने शहरातील शेकडो घरकुले अर्धवट बांधलेल्या स्थितीत रखडली आहेत. त्याकडे पालिका यंत्रणेने दुर्लक्ष चालविले असून, केंद्राची ‘सर्वांसाठी घरे’ या उत्तम योजनेच्या अंमलबजावणीस खीळ बसली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत चांदूर बाजार नगरपालिकेने पाठविलेला १६७ लाभार्थ्यांचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यासाठी ६६ लक्ष ८० हजार तसेच १ कोटी २० हजार रुपये नगर परिषदेला दोन टप्प्यात प्राप्त झाले. त्यानुसार अनुदानाचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी प्राप्त अनुदानातून बांधकाम केल्यानंतर पुढील अनुदानाच्या अभावी अनेक घरकुलधारकांचे बांधकाम अर्धवट पडले आहे. सबब, कडाक्याच्या थंडीत लोकांचे खूप हाल होत आहे. चांदूर बाजार शहरातील गरजू नागरिकांनी दोन वर्षांआधी घरकुलाचा लाभ मिळावा, म्हणून अर्ज केले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नगर परिषदेला एकूण ६०८ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट मंजूर आहे. उर्वरित लाभार्थ्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणे गरजेचे असतानासुद्धा पालिकेने शासनाकडे प्रस्ताव पााठविलेला नाही. याकरिता मुख्याधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर १६७ लाभार्थ्यांच्या पुढील तिसऱ्या टप्प्याच्या अनुदान मागणीच्या प्रस्तावानुसार त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच प्रलंबित असलेल्या उर्वरित लाभार्थ्यांचा प्रस्ताव नगर परिषदेने त्वरित शासनाकडे पाठविण्याकरिता पालिकेला निर्देशित करावे. अशी मागणी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रधान सचिव गृहनिर्माण विभाग मुंबई यांना निवेदनाद्वार केली आहे.