लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आता क्रेडिट कार्ड दिले जात आहे. याद्वारे बँकांनी मंजूर केलेल्या कर्जातील पैसे गरजेनुसार काढण्याची सोय झालेली आहे. यासाठी त्यांना संबंधित बँकेकडे अर्ज सादर करावा लागणार आहे.जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे ३,३८,३०९ शेतकरी लाभार्थी आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाकाठी सहा हजार रुपये जमा केले जातात. या अर्थसाहाय्यामुळे शेतकऱ्यांची बँकेत पत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या सोईच्या बँकेकडे अर्ज केला की, त्यांना कर्ज मंजूर होते व त्या बँकेद्वारे त्यांना क्रेडिट कार्ड दिले जाते. या कार्डाच्या आधारे शेतकरी कधीही पैसे काढू शकतात व खात्यात भरणादेखील करू शकतात. जिल्हा बँकेसह सर्वच बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात. क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी शेतकरी हा संबंधित बँकेचा खातेदार असणे व पीएम किसान योजनेचा लाभार्थी असणे आवश्यक आहे. या शेतकऱ्यांनी या बँकांकडील कर्ज घेतले, तर त्यांना आवश्यकता व गरजेनुसार पैसे काढण्याची सुविधा मिळते.
पीएम किसान सन्मान योजनेचे ३.३८ लाख लाभार्थी- योजनेसाठी जिल्ह्यातील ३,३८,३०९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे व पहिला हप्ता ३,२६,७५३ शेतकऱ्यांना मिळाला.- योजनेसाठी आता ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. मात्र, विहित मुदतीत ८९ हजार लाभार्थींनी ही प्रक्रिया केलेली नाही.
क्रेडिट कार्डचा लाभ काय?किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना पशुधन व मत्स्य व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध केले जाते. याशिवाय शेतकरी त्यांच्या गरजेनुसार बँक खात्यातून रक्कम काढू शकतात.
काय कागदपत्रे लागतातक्रेडिट कार्डसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, पासपोर्ट पोटो, पॅन कार्ड आदी कागदपत्रे जोडून संबंधित बँकेकडे अर्ज करावा लागतो व त्यानंतर पोस्टाद्वारे कार्ड घरी पाठविण्यात येते.
७० टक्के शेतकऱ्यांना मिळाले कार्डपंतप्रधान किसान योजनेतील ७० टक्के लाभार्थींना किसान क्रेडिट कार्ड मिळाले आहे. मात्र, सर्वच शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता शेतकऱ्यांनी संबंधित बँकेकडे अर्ज करणे महत्त्वाचे आहे.
बँकेकडे करा अर्जकिसान क्रेडिट कार्डसाठी शेतकऱ्यांना योजनेची रक्कम जमा होणाऱ्या बँकेकडे अर्ज करावा लागणार आहे. यासाठी त्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात व त्यानंतर बँकेद्वारा क्रेडिट कार्ड दिले जाते.
जिल्हा बँकेला या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत. अद्याप २४ हजार लाभार्थींजवळ कार्ड नाही. यासाठी त्यांना संबंधित कागदपत्रासह अर्ज करावा लागेल.- राजेश लव्हेकर, जिल्हा उपनिबंधक