अमरावती : तिवसा विधानसभा मतदारसंघातील भातकुली तालुक्यातील भालशी येथील रहिवासी व मुंबई, वरळी ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई माधुरी सोळंके हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आ.यशोमती ठाकूर यांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्याकडे केली आहे. पोलीस शिपाई माधुरी सोळंके या कर्तव्याहून घरी परतत असताना बेपत्ता झाल्यात उशिरापर्यंत घरी पोहोचल्या नाहीत. म्हणून त्यांच्या बहिणीने वरळी ठाण्याशी संपर्क साधला. मात्र तिला वाट पहा, असा सल्ला देऊन ठाणेदाराने माघारी पाठविले दुसऱ्या दिवशीदेखील त्या घरी न परतल्याने धाकट्या बहिणीने वरळी पोलीस ठाणे गाठले तिची तक्रार घेण्यात आली. मात्र तीचा मृतदेह समुद्राच्या खाडीत सापडून आला. पोलिसांनी या मृतदेहाची बेवारस म्हणून नोंद केली. पोलिसांनी जर अगोरदरच तक्रार नोंदवून घेतली असती तर माधुरीची हत्या टळली असती, असा आरोप आ.यशोमती ठाकूर यांनी केला. माधुरीचा गळा, दोन्ही हात, शरीराचे नाजूक अवयव तिष्ण धारदार शस्त्राने कापल्याचे आढळून आले. मात्र, पोलीस प्रशासन माधुरीचा मृत्यू हा रेल्वे अपघात झाल्याचे सांगत आहे. असा अपघात झाला असता तर माधुरीच्या शरीराचे तुकडे झाले असते. यामध्ये माधुरीच्या मारेकऱ्यांना वाचविण्याचाच प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आ.यशोमती ठाकूर यांनी केला. माधुरीच्या धाकट्या बहिणीसह सोमवारी दुपारी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांची भेट घेऊन याप्रकरणाचा निषेध व्यक्त केला. माधुरी सोळंके महिला पोलीस शिपाई असताना देखील पोलीस प्रशासन माधुरीच्या मारेकऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या प्रकरणाची तत्काळ सखोळ चौकशी करावी व आरोपींना अटक करुन गुन्हे दाखल करावी, अशी मागणी आ.यशोमती ठाकूर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली. (प्रतिनिधी)
पोलीस शिपाई माधुरीचे मारेकरी अद्याप मोकाट कसे ?
By admin | Published: August 23, 2016 12:57 AM