प्रवाशांच्या सवाल, अतिरक्त आकारणीने खिशाला ताण, रेल्वे प्रवास झाला महाग
अमरावती : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाने नियमित रेल्वे गाड्या बंद करण्यात आला. मात्र, कालांतराने काही लांब पल्ल्याच्या गाड्या विशेष रेल्वेच्या नावाखाली सुरू करण्यात आल्यात. परंतु, या विशेष रेल्वे गाड्यांचे प्रवास दर जादा आणि आरक्षण अनिवार्य केल्याने प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे. त्यामुळे विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावरून दररोज, साप्ताहिक रेल्वे गाड्या धावतात. हल्ली विशेष रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल आहेल. अगोदरच्या रेल्वे गाड्यांच्या तुलनेत प्रतिप्रवासी १५ रुपये तिकिटांसाठी जादा आकारले जात आहेत. कोणत्याही रेल्वे स्थानकावर प्रवास करायचा असल्यास जादा तिकीट दर द्यावे लागत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. अशातच आरक्षणाची सक्ती असल्याने रेल्वेचा प्रवास महागडा ठरत आहे.
--------------------
जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या
- हावडा-मुंबई मेल, एक्स्प्रेस, गितांजली
- नागपूर-पुणे, गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस
- अमरावती- मुंबई, पुणे, तिरूपती
- भुसावळ-निझामुद्दिन गोंडवाना एक्स्प्रेस
- अहमदाबाद-चैन्नई नवजीवन एक्स्प्रेस
-----------------
तिकिटात फरक किती?
कोणत्याही विशेष रेल्वे गाडीत प्रवास करायचा असल्यास प्रतिव्यक्ती १५ रुपये अतिरिक्त द्यावे लागत आहेत. आरक्षण तिकिटाचा दर पूर्वीप्रमाणेच घेण्यात येत आहे.
----------------
आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी
१) कोरोनात रेल्वे गाड्या बंद होत्या. मात्र, रेल्वेने काही गाड्या विशेष या सदराखाली सुरू केल्या आहेत. या गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवास नाही, अन्यथा जनरल प्रवासाचे प्रतिव्यक्ती १५ रुपये आकारले जातात. त्यामुळे आरक्षणाची सक्ती बंद करावी.
२) मुंबई, दिल्ली, हावडा असा लांब प्रवास करायचा असल्यास आरक्षण तिकीट घेऊनच डब्यात प्रवेश मिळतो. हल्ली जनरल डबे नसल्याने गरीब, सामान्य प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे.
-----------------
प्रवासी म्हणतात....
‘‘ आता राज्य सरकारने काही अटी-शर्तींच्या अधीन राहून अनलॉक केले आहे. त्यामुळे व्यावसायिक, नोकरदार, सामान्य प्रवाशांना रेल्वे गाड्यांनी प्रवास करावा लागतो. अलीकडे गर्दीदेखील वाढली आहे. पूर्वीप्रमाणे एक्स्प्रेस, पॅसेजर गाड्या सुरू व्हाव्यात. त्यामुळे अतिरिक्त पैसे लागणार नाही.
- दयाराम ग्वालानी, बडनेरा
-----
‘‘ दीड वर्षापासून कोरोनामुळे नातेवाइकांच्या भेटीगाठी दुर्लभ झाल्या आहेत. कसेबसे आता सर्व सुरळीत होत असताना विशेष रेल्वे गाड्यांनी प्रवास म्हटला की, आरक्षण आणि जादा दराचे तिकीट खरेदी करावे लागते. हा सर्व खर्च सामान्यांना परवडणारा नाही.
- हिना बांबोडे, अमरावती