अनिल कडू लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांसह वन व वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या मेळघाटातील जंगलाला यावर्षी मोठ्या प्रमाणात सर्वाधिक आगी लागल्या आहेत. यात हजारो हेक्टर जंगल क्षेत्र काळवंडले आहे. कोट्यवधी रुपयांची मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली आहे. जैवविविधता धोक्यात आली आहे. असे असूनही वन व वन्यजीव विभागाच्या रेकॉर्डला केवळ पालापाचोळा व गवत जळाल्याची नोंद घेतली गेली आहे. ही नोंद बैलबंडीत मोजली गेली आहे. इंग्रजांपासून ही बैलबंडीची पद्धत असून, ती आजही वन व वन्यजीव विभागात कायम आहे.मेळघाटातील गाविलगड किल्ल्यावर काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत ४२ हेक्टर जंगल क्षेत्र जळून खाक झाले. शेकडो वर्षांपासूनची कोट्यवधीची नैसर्गिक वनसंपदा नष्ट झाली. दगडांवरील मौल्यवान मातीचा थर नष्ट झाला. असे असतानाही गाविलगडावरील आगीत केवळ ४२ बैलबंड्या पालापाचोळा व गवत जळाल्याची नोंद वन्यजीव विभागाने घेतली आहे. गाविलगडासह लगतच्या अन्य कम्पार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीच्या अनुषंगाने वन्यजीव विभागाने अज्ञात आरोपींविरुद्ध दोन वन गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात आरोपी शोधून काढले जातात की पुन्हा तपासाची कारवाई अंतिम निर्णयाविना होते, याची चर्चा मेळघाटसह अचलपूर तालुक्यात होत आहे.
शेकडो वनगुन्हे; आरोपी अज्ञात जंगलाला लागलेल्या आगीच्या अनुषंगाने वनगुन्हा नोंदविल्या जातो हा वन गुन्हा अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल केला जातो. पण, आगीच्या अनुषंगाने त्या अज्ञात आरोपींचा शोध घेणारी सक्षम यंत्रणा वन व वन्यजीव विभागाकडे अस्तित्वातच नाही. एक-दोन अपवादवगळता आगीच्या मेळघाटातील शेकडो वनगुन्ह्यातील आरोपी आजही बेपत्ता आहेत.
पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्षगाविलगड किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. १७ किलोमीटर आवार भिंतीला सतरा ठिकाणी भगदाड पडली आहे. यात किल्ल्यात जायला चोर मार्ग निर्माण झाले आहेत. पण, याकडे पुरातत्व विभाग लक्ष द्यायला तयार नाही. केवळ मुख्य प्रवेशद्वारावर पर्यटकांकडून प्रवेश फी वसूल करण्याचा धंदा तेवढा पुरातत्व विभाग करीत आहे.
गाविलगडाचे वाटपगाविलगड किल्ल्याच्या बाहेरील दगडी १७ किलोमीटर लांबीच्या आवार भिंतीसह गाविलगडावरील ऐतिहासिक वास्तू व वस्तूंची देखभाल व दुरुस्ती मालकी हक्काने केंद्रीय पुरातत्व विभागाकडे आहे, तर आतील वनक्षेत्र हे वन्यजीव विभागाच्या मालकीचे आहे. या जंगल क्षेत्राची निगा राखण्याची जबाबदारी वन्यजीव विभागाकडे जाते.