अमरावती : कोरोनाचा उत्परिवर्तन झालेल्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये लसीकरण सर्वात प्रभावी आहे. जिल्ह्यात मात्र, आतापर्यंत २१ टक्केच लसीकरण झाले आहे. यात पहिला डोस घेणारे १६ टक्के व दुसरा डोस घेणारे फक्त ५ टक्केच नागरिक असल्याने जिल्ह्यासह आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून पाच टप्प्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झालेली असली तरी पुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरणाची मोहीम मंदावली आहे. अर्धेअधिक लसीकरण केंद्र बंदच राहतात. शहरातील केंद्रांवर गर्दी राहत असल्यामुळे नागरिक पहाटेपासून केंद्रांवर रांगा लावतात. या आठवड्यात सर्वाधिक मागणी असलेल्या कोविशिल्डचा ठणठणाट असल्याने शनिवारी स्टॉक उपलब्ध होताच पुन्हा रांगा लागल्या आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत फक्त ६,४६,०१३ नागरिकांचेच लसीकरण झाले असून, ६,५७,०४० लसींचा पुरवठा करण्यात आला. यात ५,०६,३३० कोविशिल्ड तर १,५०७१० कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात १०२ केंद्र आहेत. यात १९ केंद्र महापालिका क्षेत्रातील आहेत. ऑनलाईन नोंदणी करताना स्लाॅट मिळत नाही. अगदी दोन मिनिटांत तेथील कोटा फुल्ल होत आहे. पुन्हा नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने हा कंटाळवाणा फॉस्टेट फिंगर फस्ट’चा खेळ ठरला आहे.
बॉक्स
१८ ते ४४ गटात फक्त तीन टक्केच
* १८ ते ४४ वयोगट फार महत्त्वाचा असताना या गटात आतापर्यंत ८४,३१२ नागरिकांचेच लसीकरण झालेले आहे. यात पहिला डोस ७३,४१४ व दुसरा डोस फक्त १०,८९८ नागरिकांनीच घेतलेला आहे.
* या गटात कोविशिल्डचे १,७६,८६५ व कोव्हॅक्सिनचे १०,८९८ नागरिकांचे लसीकरण झालेले असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
पाईंटर
जिल्ह्यातील एकूण लसीकरण
६,४६,०१३
पहिला डोस
४,८४,५७६
दुसरा डोस
१,६१,४३७
विविध वर्गवारीतील लसीकरण
हेल्थ केअर वर्कर : पहिला २०,८४३, दुसरा १४,४७३
फ्रंट लाईन वर्कर : पहिला ४१,५७५, दुसरा १४,२९४
१८ ते ४४ वयोगट : पहिला ७३,४१४, दुसरा १०,८९८
४५ ते ५९ वयोगट : पहिला १,७६,५५८, दुसरा ४८,८४८
६० वर्षांवरील : पहिला १,७२,१८६, दुसरा ७२,९२४
बॉक्स
ज्येष्ठ नागरिकांचे सर्वाधिक लसीकरण
जिल्ह्यात पाच वर्गवारीत लसीकरण होत असले तरी यात सर्वाधिक लसीकरण ज्येष्ठ नागरिकांचे झालेले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार पहिला डोस १,७२,१८६ व दुसरा डोस ७२,९२४ ज्येष्ठ नागरिकांनी घेतल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.