गणेश देशमुख
डेंग्यूने शहराला घातलेला विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असतानाच वैद्यकीय तांत्रिक त्रुटींमुळेदेखील रुग्ण संभ्रमित होऊ लागले आहेत. एकाच रुग्णाच्या रक्तनमुन्यांचे दोन परस्परविरोधी अहवाल येऊ लागल्यामुळे शहरातील डॉक्टरांवर नाहक संशय व्यक्त होत आहे.डेंग्यूबाधित रुग्णाला खासगी डॉक्टरांकडे उपचार घेण्याशिवाय कुठलाही पर्याय शहरात उपलब्ध नाही. शासकीय रुग्णालयांमधील व्यवस्था अत्यंत तोकडी आहे.इंडियन मेडिकल असोसिएशनचे अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. पद्माकर सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शंभर दवाखाने आणि दीडशे रुग्णालये आहेत. हे सर्वच दवाखाने आणि रुग्णालये डेंग्यूरुग्णांनी ओसंडून वाहत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, शहरातील डेंग्यूबाधित प्रौढांचा आकडा दीड हजार आणि दहा वर्षे वयोगटापर्यंत मुलांचा आकडा ३०० इतका आहे.डॉक्टर दहशतीतखासगी डॉक्टरांनी डेंग्यूचे रुग्ण दाखल असल्याची माहिती माध्यमांना दिल्याच्या कारणावरून महापालिकेने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. खरे तर शहरात दाखल झालेला डेंग्यू पसरू नये, या पाक उद्देशाने खासगी डॉक्टरांनी सदर माहिती जाहीर केली. तथापि, महापालिकेने त्यांच्याभोवतीच कारवाईचा फास आवळल्यामुळे पूर्वी १०-१२ डेंग्यूचे रुग्ण असतानाही माहिती देणारे खासगी डॉक्टर आता शहरभर हजारो रुग्ण होऊनही खरी माहिती देण्यास धजावत नाहीत. याच कारणाने डेंग्यू रुग्णांच्या उपचारादरम्यान निर्माण होऊ लागलेल्या काही गंभीर त्रुटींबाबतही डॉक्टर खुलून बोलायला तयार नाहीत.काय आहे त्रुटी?खासगी डॉक्टरांकडे दाखल झालेल्या रुग्णाची खासगी पॅथॉलॉजी लेबॉरेटरीत करण्यात येणारी 'रीअॅक्टिव्ह' स्वरूपाची रक्तजल चाचणी पॉझिटिव्ह येते. तथापि, महापालिकेने त्याच रुग्णाच्या रक्ताचे यवतमाळ येथील सेंटिनल सेंटरमध्ये पाठविलेले नमुने निगेटिव्ह येतात. या विचित्र प्रकारामुळे रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होतो. शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल डेंग्यू नसल्याचा आहे आणि खासगी डॉक्टरांनी मात्र डेंग्यू असल्याचे सांगून नाहकच हजारो रुपयांनी गंडविले, अशी भावना सामान्यजनांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. डेंग्यूच्या राक्षसी विळख्यातून बाहेर काढण्यास ज्या डॉक्टरांची अहोरात्र मदत होत आहे, त्याच डॉक्टरांविरुद्ध या प्रकारामुळे वातावरणनिर्मिती होत आहे.का घडते असे?डेंग्यूचा संशय येताच खासगी डॉक्टर रुग्णाचे रक्तनमुने खासगी पॅथॉलॉजी लेबॉरेटरीत पाठवितात. महापालिकेला सदर रुग्णाबाबत माहिती दिलेली असते. तथापि, महापालिका त्या रुग्णांचे रक्तनमुने पाच ते सात दिवसांनंतर यवतमाळच्या शासकीय प्रयोगशाळेत पाठविते. वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रथम पाच दिवसांत एनएस-वन ही चाचणी करावी. त्यानंतर आजीएम ही चाचणी करावी. सात दिवसांनंतर एनएस-वन ही चाचणी केल्यास डेंग्यू असूनही अहवाल 'निगेटिव्ह' येतो. नेमके घडते आहे हेच.