महाविद्यालय, उद्यान भागात टवाळखोरी : अश्लील शेरेबाजीने तरुणींची छेड
अमरावती : व्हॅलेंटाईन डे, रोझ डे अशा विविध डेच्या माध्यमातून बाहेरील तरुण चोरी-छुपे महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करतात. अशा तरुणांकडून तरुणींच्या छेडखानीचे प्रकार घडतात, तर अनेक चौकातदेखील टवाळखोरांचा जमावडा असतो. शहरात ठिकठिकाणी रोडरोमियोचे कट्टे निर्माण झाले आहेत. त्यामुळे घराबाहेर पडलेली मुलगी सुरक्षित किती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शाळा-कॉलेजकडे जाण्याच्या मार्गावर, चौकात रोडरोमियो रोज उभे राहून विद्यार्थिनी, नोकरीवर निघालेल्या तरुणी व महिलांवर कमेंट पास करत उभे असतात. मुलगी दिसली की, तिच्याकडे एकटक पाहत राहणे, शिट्टी वाजविणे, जोरात हॉर्न वाजविणे, महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये घोळक्याने उभे राहून अश्लील शेरेबाजी करणाऱ्या सडक सख्याहरींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. केवळ बदनामी नको म्हणून मुली पुढे धजावत नाहीत.
////////////
या ठिकाणी आहे रोडरोमियोंचा वावर
बांबू गार्डन
शहरातील रोडरोमियोंसाठी, टवाळखोरांसाठी हे ठिकाण हक्काचे आधारस्थान बनले आहे. शहरापासून दूर अंतरावर येथे छेडखानीचे, अश्लील शेरेबाजीचे अनेक प्रसंग घडतात. अनेकांनी त्याला दुजोरा दिला आहे.
/////////
छत्री तलाव परिसर
दररोज या भागात ‘मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक’ करणाऱ्यांची कमी नाही. नेमके तेच हेरून विशिष्ट भागातील तरुणाईचे एक टोळके येथे हमखास पाहावयास मिळते. वाद नको म्हणून कुणी हटकतदेखील नाही.
////////////
कॅम्प स्थित मॉलबाहेरील परिसर
शहरातील कॅम्प स्थित एका मॉलबाहेरील परिसरात तरुणींच्या छेडखानीचे प्रकार घडले आहेत. त्या घटनांबाबत संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारीदेखील नोंदविण्यात आल्या आहेत.
/////////
कोणी छेड काढत असेल, तर येथे साधा संपर्क
तरुणी, महिलांमध्ये आपण असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाल्यास त्यांनी तात्काळ अमरावती शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी १००, १०९१ व ०७२१-२५५१००० या फोन क्रमांकावर संपर्क करून स्वत: कोणत्या ठिकाणी आहे, याबाबत माहिती संबंधित पोलीस अधिकारी यांना द्यावी.
/////////////
छेड काढणारे अनेक जणांच्या मुसक्या आवळल्या
१) शहर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी महिला, तरुणी, मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
२) टवाळखोर व रोडरोमियांना चांगला चोप देऊन त्यांना गजाआड करण्यात आले आहे.
३) याशिवाय पोलीस आयुक्तालय स्तरावर शांतता समिती, ज्येष्ठ नागरिक, महिला संघटनांच्या बैठकी घेऊन तरुणाईचेदेखील समुपदेशन करण्यात येते.
//////////
दामिनी पथक काय करते?
१) दामिनी पथकातील महिला पोलीस दुचाकीवरून शहरभरातील संवेदनशील भागात गस्त घालत असतात.
२) छेडखानीची तक्रार आल्यास, घटनास्थळी जाऊन अशा घटनांना प्रतिबंध घातला जातो. संबंधितांवर ‘खाकी’चा बडगा उगारला जातो.
//////////
महिला, तरुण मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. अलिकडेच शहर नियंत्रण कक्षात महिला सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तेथील क्रमांकदेखील जाहीर करण्यात आले आहेत. महिला, मुलींना कुठेही असुरक्षित वाटल्यास त्यांनी या कक्षाशी विनाविलंब संपर्क साधावा.
डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त