दहावीचा निकाल वाढला, उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुणांच्या आधारे अकरावीत प्रवेश
अमरावती : यंदा दहावीचा ऑनलाईन निकाल डोळे दीपवून टाकणारा ठरला. बहुतांश विद्यार्थी प्रावीण्य, प्रथम श्रेणीत झळकले. मात्र, अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) उच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झाली. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या जागा कमी, दहावीचा निकाल जास्त अशी स्थिती आहे. गुणी विद्यार्थी चिंतेत असून, मनासारखे कनिष्ठ महाविद्यालय मिळेल अथवा नाही, अशा द्विधा मनस्थितीत आहेत.
उच्च न्यायालयाने दहावीच्या गुणांच्या आधारे अकरावीत प्रवेश सहा आठवड्यात करण्याचे आदेश जारी केले आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाला सीईटी परीक्षेचा गाशा गुंडाळावा लागला आहे. आता दहावीच्या गुणांच्या आधारे अकरावीत प्रवेश मिळेल, असे नव्या प्रवेशाची नियमावली असणार आहे. मात्र, कोरोनामुळे ना शाळा, ना परीक्षा थेट निकालाने दहावीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. साहजिकच गुणी विद्यार्थ्यांवर अकरावी प्रवेशात अन्याय होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यात दहावीचे ३८९६४ विद्यार्थी उत्तीर्ण असून, गुणांच्या आधारे अकरावीत प्रवेश दिला जाणार आहे.
-------------------
विद्यार्थी स्थिती
दहावी : ३८९६४
अकरावी प्रवेशाची क्षमता : १५६७० (अमरावती महानगर)
-------------
अशी आहे शहरात शाखानिहाय जागा
कला : ३३७०
वाणिज्य : २४०३
विज्ञान : ६५४०
एमसीव्हीसी : ३०२०
-----------------
महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार
यंदा दहावीच्या निकालाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे प्रवेशासाठी नक्कीच गर्दी होईल. गतवर्षी ८८ टक्के व यंदा ९९.५७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परिणामी १० टक्के अकरावीच्या जागांवर प्रवेशासाठी ताण वाढेल. यंदा अकरावी प्रवेशासाठी ३१० जागा वाढल्याने थोडाफार दिलासा आहे. मात्र, एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असे नियोजन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती राबविणार आहे, अशी माहिती समन्वयक अरविंद मंगळे यांनी दिली.
------------------
विद्यार्थी चिंतेत
‘‘दहावीचा निकालानंतर अकरावी प्रवेश मनासारख्या कॉलेज मिळावा, यासाठी सीईटीची तयारी चालविली. मात्र, आता सीईटी नाही, थेट प्रवेश मिळणार आहे. यात गुणी विद्यार्थ्यांचे नक्कीच नुकसान होणार आहे.
- चुटकी रोकडे, विद्यार्थिनी
----------------
दहावीचा जम्बो निकाल लागला. त्यामुळे कोणत्या कॉलेजमध्ये कसा प्रवेश मिळेल, याचे तूर्त सांगता येणार नाही. मात्र, सीईटी परीक्षा झाली असती, तर यात खरे हुशार विद्यार्थी कोण, हे समोर आले असते. आता अकरावी प्रवेशात गुणी विद्यार्थ्यांवर अन्यय होण्याची शक्यता आहे.
- अल्पेश वानखडे, विद्यार्थी,
---------------------
कोट
‘‘ १६ ऑगस्टपासून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू होत आहे. शासनाने यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन जारी केले नाही. यंदा नक्कीच कटऑफ वाढेल, असे संकेत आहेत. सीईटी परीक्षा रद्द झाल्याने अकरावी प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार आहे.
- दीपक धोटे, प्राचार्य, ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय.
---------
कोट
- राजेश देशमुख, प्राचार्य, बॅ. आर.डी,आय.के.महाविद्यालय
-------------------