लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावरील तापमान मंगळवारी पहाटे ६ वाजता ४ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले गेले. चिखलदरा परिसरात सर्वत्र गारठा पसरला असून, पर्यटक या आल्हाददायक वातावरणाची मौज घेत आहेत.चिखलदरा पर्यटनस्थळावर मंगळवारी पहाटे सर्वात कमी ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. येथील सिपना महाविद्यालयातील तापमान केंद्रावर ५ डिग्री अंश सेल्सिअसची नोंद सर्वात कमी झाल्याची सांगण्यात आले. चिखलदरा शहर अप्पर आणि लोअर प्लेटो अशा दोन टप्प्यांत वसले आहे. त्यामुळे खालच्या भागातील लोअर प्लेटो असलेल्या चिखलदरा शहरात ४ अंश डिग्री सेल्सिअसची नोंद गुगलच्या तापमान अहवालावर झाली आहे. धारणीतही रात्रीचे तापमान ७ अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदले गेले आहे. अचलपूर-परतवाड्यात रात्रीचे तापमान ८ अंशावर आले आहे. दिवसभर थंड वारे वाहत आहेत. पर्यटक या आल्हाददायी वातावरणाचा आस्वाद घेत असून अगदी पहाटे रान भ्रमंतीसाठी निघत आहेत. एकंदरीतच विदर्भातील नंदनवनाला हुडहुडी भरली आहे.तीन महिन्यांपासून शेकोट्या पेटल्याचिखलदरा व मेळघाटच्या आदिवासी गावांत नोव्हेंबर महिन्यापासून रात्रीच्या शेकोट्या पेटल्या. मात्र, मागील आठवड्यापासून दिवसाही शेकोटी पेटवून नागरिकांना थंडीपासून संरक्षण करावे लागत आहे. तीच स्थिती चिखलदारा शहराची असून, येथे येणारे पर्यटकांना दिवस-रात्र शेकोटीपासून ऊब घ्यावी लागत आहे. दोन वेळा आलेल्या थंडीच्या लाटेनंतर पुन्हा मागील सात दिवसांपासून ढगाळ वातावरण व अचानक वाढलेल्या कडाक्याच्या थंडीने अंगात हुडहुडी भरली आहे.चिखलदरा सर्वात थंडचिखलदरा पर्यटनस्थळ सर्वाधिक थंड असल्याचे पुन्हा यावर्षी तिसऱ्यांदा सिद्ध झाले आहे. तालुक्यातील घटांग, कोलकास, सेमाडोह या गावांसह लगतच्या मध्यप्रदेशातील कुकुरू खामला दरीतसुद्धा ७ डिग्री सेल्सिअस तापमानाची सर्वात कमी नोंद मंगळवारी झाली आहे. त्यामुळे चिखलदरा मंगळवारी पहाटे ६ वाजता सर्वाधिक थंड असे होते.आणखी दोन दिवस थंडीकश्मीर, हिमाचल, उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. लगतच्या पंजाब, हरियाना व राजस्थान, उत्तर भारत व पूर्व भारतात तीव्र थंडीची लाट आहे. पूर्व दिशेकडून वाहणारे वारे थंडावले आहेत. आता महाराष्ट्रात उत्तर-ईशान्य दिशेकडून वारे वाहत असल्यामुळे विदर्भात थंडीची लाट आली आहे.
पुन्हा हुडहुडी : विदर्भाच्या नंदनवनाचा पारा घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:14 PM