आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये पक्षकारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून २५७ दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.लोकअदालतीत मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँकेचे प्रलंबित प्रकरणे, चेक न वटल्याचे प्रकरणे (निगोशिएबल इन्सट्रुमेंट अॅक्ट), भुसंपादन प्रकरणे, विवाह संबंधी कायद्याचे दावे, बँकेचे तसेच दिवाणी व फौजदारी अपील व इतर दिवाणी प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता. लोक अदालतीत ठेवलेल्या प्रकरणांची पूर्तता करण्यासाठी जिल्ह्यात एकूण ३२ मंडळांची निर्मिती करण्यात आली होती. ज्यामध्ये न्यायाधीश, अधिवक्ता गण व कर्मचारी यांचा समावेश होता. जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित प्रस्तुत लोकअदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून जनतेने प्रचंड प्रमाणात लाभ घेतला.लोक अदालतीत जिल्ह्यातून ५०४ दाखलपूर्व प्रकरणे ठेवली होती. त्यापैकी २५७ दाखलपूर्व प्रकरणांचा तर ३०८१ प्रलंबित प्रकरणांपैकी ६७३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या माध्यमातून एकूण ९,७६,२५,५६५ रूपये तडजोडीच्या रकमेच्या प्रकरणांचा निवाडा झाला.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल ल. पानसरे व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, अमरावती तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती व्ही.के. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत यशस्वीरित्या पार पडली. यावेळी नागरिकांची गर्दी झाली होती.
राष्ट्रीय लोकअदालतला पक्षकारांचा प्रचंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 10:40 PM
जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देविविध प्रकरणांचा निपटारा : नागरिकांची गर्दी