अमरावती : भाजपचे १०५ आमदार असताना राज्य सरकारमध्ये केवळ आठ मंत्री आहेत. मात्र, उपऱ्यांना रेड कार्पेटची संधी मिळत असल्याची तीव्र भावना भाजप आमदारांची असून, त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता दिसून येत असल्याची टीका माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेतून केली.
अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यानंतर पत्रकार परिषदेत देशमुख यांनी भाजपवर निशाणा साधला. पक्ष फोडाफोडीचे कटकारस्थान भाजपने राज्यात सुरू केले आहे. स्वत:च्या क्षमतेवर भाजप सत्तेत येऊ शकत नाही, हे दीड वर्षापूर्वी त्यांना कळले होते. म्हणूनच अगोदर शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादीवर प्रयोग झाला. ज्येष्ठ नेते भाजपच्या गळाला लागले, याचे शल्य आहे. पण आजही सामान्य कार्यकर्ता शरद पवार यांचे विचार, निष्ठांवर कायम असल्याचा दावा त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा घरी परतले तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागतच होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ‘साहेब’ की ‘दादा’ कोणासोबत आहेत, त्यापेक्षा २०२४ च्या निवडणुकीत कोणाचे आमदार निवडून येतील, हे महत्वाचे ठरणार आहे. राज्याचे ट्रिपल इंजिनचे सरकार हे शेतकरी, ओबीसी विद्यार्थी, आरक्षण, धनगरांचे प्रश्न, जनगणना अशा सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला. पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन देशमुख, माजी विधानसभा उपाध्यक्ष शरद तसरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, विनेश आडतिया, वर्षा निकम आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडी कायम, शरद पवार यांचे राज्यभर दौरे
महाविकास आघाडी कायम असून, येत्या काळात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी या तीनही नेत्यांच्या संयुक्तपणे सभा होतील, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. विशेषत: शरद पवार यांचे राज्यभर दौरे होतील. अमरावतीलासुद्धा पवार येतील. भाजपची कुटनीती, फोडाफोडीच्या राजकारणाला आता जनताच उत्तर देईल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.