कामगार खाते : निरीक्षकांच्या सहआयुक्तांना वाकुल्या लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : हुक्कापार्लरचे असांस्कृतिक बिज सुसंस्कृत शहरात रोवून येथील परंपरांना गालबोट लावणाऱ्यांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्याचे आदेश सहायक कामगार आयुक्तांनी दुकाने निरीक्षकांना दिले आहेत. मात्र, या आदेशाला वाकुल्या दाखवून निरीक्षकांनी सहायक आयुक्तांच्या कार्यालयीन आदेशाची बेअदबी केली आहे. तक्रार दाखल करण्याच्या आदेशाला तीन दिवस उलटूनही हुक्का पार्लर संचालकांविरूद्ध एकही तक्रार दाखल न केल्याने दुकाने निरीक्षकांच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या निरीक्षकांना शहरात हुक्का पार्लर संस्कृती हवी आहे काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. शहरात ‘अड्डा-२७’ सह पाच हुक्का पार्लर्समधून येथील सांस्कृतिकतेला गालबोट लावले गेले. हुक्का पार्लरच्या संचालकांनी कामगार आयुक्त कार्यालयातून नोंदणी प्रमाणपत्र मिळविताना तेथे दर्शविलेल्या व्यवसायाखेरीज इतर आक्षेपार्र्ह प्रकार चालत असल्याचे बजरंग दलाने कामगार खात्याच्या लक्षात आणून दिले. हुक्का पार्लरच्या संचालकांनी चालविलेला हा प्रकार शासकीय नियमांचा भंग तसेच फसवणूक करणारा असल्याने या हुक्का पार्लर संचालकांवर कारवाई व्हावी आणि ही संस्कृती शहरातून नष्ट व्हावी, अशी भूमिका बजरंग दलाने प्रकर्षाने मांडली. याअनुषंगाने चौकशी करून सहायक कामगार आयुक्तांनी शहरातील ‘अड्डा-२७’ सह इतर पाच हुक्का पार्लर्सची नोंदणी रद्द केली. शासन नियमांची अवहेलना व दिशाभूल केल्याप्रकरणी हुक्का पार्लर्स संचालकांविरूद्ध पोलीस तक्रार करण्याचे आदेश दुकाने निरीक्षकांना दिलेत. इतकेच नव्हे तर पोलीस आयुक्तांनाही याच अनुषंगाने एक पत्र पाठविण्यात आले. मात्र, निरीक्षकांनी एकाही हुक्का पार्लर संचालकाविरूद्ध पोलिसांत तक्रार दिलेली नाही. त्यामुळे अनेक शंका उपस्थित होत आहेत. दुकाने निरीक्षकांनी हुक्का पार्लर्स संचालकांविरूद्ध नियमभंगाची पोलीस तक्रार दिल्यास दोषींवर गुन्हे नोंदवून त्यांच्या अटकेचा मार्ग प्रशस्त होऊ शकतोे. त्यातूनच या प्रकरणाची पाळेमुळे आणखी किती खोलवर रूजली आहेत, हे देखील स्पष्ट होऊ शकते. मात्र, दुकाने निरीक्षकांद्वारे पोलिसांत तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ होत असल्याने त्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. व्हिडिओ क्लिपचा पुरावा उपलब्ध हुक्का पार्लर संचालकांविरूद्ध पोलीस तक्रार करण्यासाठी दुकाने निरीक्षकांकडे ‘व्हिडिओ क्लिप’चा सज्जड पुरावा उपलब्ध आहे. याचा वापर करून पोलीस तक्रार केली जाऊ शकते. नागरिकांचा या प्रकरणाबाबत प्रचंड रोष पाहता निरीक्षकांनी तातडीने कारवाई अपेक्षित आहे.
हुकमाची बेअदबी
By admin | Published: May 20, 2017 12:30 AM