फोटो पी २७ सापन अनिल कडू
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील निजामपूर गावाजवळून जाणाऱ्या सापन नदीपात्रातून शेकडो गाढवांकरवी शासकीय कामावर रेतीची उचल केली गेली. यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. या अवैध रेती उत्खननातून सापन नदीपात्रात मोठे मोठे, जीवघेणे खड्डे पडले आहेत. सापन नदीचे पात्र त्या परिसरात पोखरले गेले आहे.
वासणी प्रकल्पांतर्गत बोरगाव दोरी या गावचे पुनर्वसन निजामपूर गावालगत होत आहे. पुनर्वसनाची आवश्यक ती कामे शासकीय कंत्राटदार करीत आहेत. मध्यम प्रकल्प उपविभाग चांदूरबाजारअंतर्गत हे काम २०१९ पासून सुरू आहे.
संबंधित शासकीय कंत्राटदाराला या पुनर्वसनाच्या कामाकरिता लागणारी रेती पूर्णा नदीवरून आणायची आहे. पण ही रेती अचलपूर तालुक्यातील जवरडी, बोरगावपेठ व अचलपूर शहरातील शेकडो गाढवांच्या मदतीने एकत्रितपणे सापन नदीपात्रातून काढून आणली गेली.
रेतीचे ढिगारे सील
दरम्यान, २७ मे रोजी सकाळी संबंधित क्षेत्राच्या तलाठ्यांनी प्रत्यक्ष पुनर्वसनाच्या कामावर जाऊन तेथील रेतीचे ढिगारे सील केलेत. या ढिगाऱ्यांच्या अनुषंगाने रॉयल्टी पाससह आवश्यक दस्तावेजाची उपस्थितांकडे मागणी केली. याकरिता दीड तासाचा अवधी त्यांना दिला. पण ते तो दस्तावेज सादर करू शकले नाहीत. अखेर पोलीस पाटलांसह तीन प्रतिष्ठित गावकऱ्यांच्या उपस्थितीत तलाठ्यांनी त्या रेती ढिगाऱ्याचा पंचनामा करून अहवाल तहसीलदारांकडे सादर केला आहे.
तहसीलदारांना निवेदन
दरम्यान, बोरगाव दोरी पुनर्वसनाच्या कामावर सापन नदीतील रेती संबंधितांनी वापरल्याची तक्रार मनसेचे राज पाटील यांनी तहसीलदारांकडे २७ मे रोजी केली आहे. यात चर्चेदरम्यान संबंधितांवर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.