- गजानन मोहोड अमरावती : आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळचळीदरम्यान दान मिळालेल्या जमिनींची प्रशासनाच्या अनास्थेने वाट लागली आहे. यवतमाळ तालुक्यात मौजा मोहा येथे १००.८५ हेक्टर जमिनीच्या भूदान नोंदी महसूल विभागाच्या रेकार्डवरुन गायब करून प्रशासनाच्या संगनमताने भूमाफीयांनी याची चक्क विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार भूदान यज्ञ मंडळाने उघडकीस आणला आहे. तशी तक्रारही त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
मौजा मोहा येथील अंंबादास विश्वनाथ भुमरे यांची ४१३.७९ हेक्टर जमीन २८ सप्टेंबरच्या १९५५ चय आदेशानुसार भूदान यज्ञ मंडळाला देण्यात आली होती. फेरफार क्रमांक ३०५३ मधील नमुना १ (११) मध्ये याची रितसर नोंद घेण्याात आलेली आहे. यापैकी १००.८५ हेक्टर आर जमीन ही मोहा येथील सर्वोदय ग्राम परिवार संस्थेला विविध प्रयोजनासाठी देण्यात आली. या संस्थेद्वारा शर्थभंग झाल्याने त्या संस्थेचा भूदान पट्टा भूदान यज्ञ मंडळाने रद्द केला व या जमिनीची नोंद भूदान यज्ञ मंडळाचे नावे करण्याबाबतचे प्रकरण यवतमाळ तहसीलदार यांचे कार्यलयात प्रलंबित आहे.
भूदान यज्ञ मंडळाला प्राप्त झालेली ४१३.७९ हेक्टर जमीन ही ८७ गटात विभागली होती. याची तहसील कार्यालयात नमुना १ क (११) मध्ये तितक्यच गटांची माहिती समाविष्ट असणे आवश्यक आहे. भूदान यज्ञ मंडळाच्या भूदान अंकेक्षणचे संयुक्त सचिव नरेंद्र बैस यांनी याविषयी चौकशी केली असता केवळ ५३ गटांच्याच नोंदी व माहिती या नमुन्यात समाविष्ट असल्याचे उघडकीस आले आहे.उर्वरीर ३४ गट यामध्ये गायब करण्यात आल्याच धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. या गटांची महसूल विभागाच्या संगनमताने दलालांनीच वाट लावल्याचा आरोप होत आहे. भूदानची जमीन अहस्तांतरणीय असल्याने त्याची रितसर नोंद भूदान यज्ञ मंडळाचे नावे करणे महत्वाचे आहे. याविषयी येथील विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आलेली आहे.
नोंदी नसलेल्या ३४ गटांची वस्तुस्थिती
पहूर पुनर्वसनाच्या नोंदी असलेले एकूण ८ गट आहेत. याव्यितिरिक्त एकूण ८ गटात ९७१ निवासी प्लॉट पाडून विक्री करण्यात आलेले आहे. अकृषक परावर्तीत १ गट, संगणकीय प्रणालीतून प्राप्त न होऊ शकलेले २ गट आहे. शासन निर्देशाचे उल्लंघन झाल्याची माहिती यवतमाळ जिल्ह्णातील यवतमाळ तहसीलदारांना देण्यात आलेली असतांना अद्यापर्यत प्रकरण प्रकरण निकाली निघालेली नाहीत त्यामुळे आता विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या देण्याच मानस या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.