बडनेरा : एमआयडीसी परिसरातून जाणारा मुख्यमार्ग डांबरीकरणाने सुसज्ज झाला असतानासुद्धा या मार्गावर अर्ध्या भागात पथदिवे लावण्यात आले नाही. शेकडो कामगारांना अंधारातच आपले घर किंवा कामाचे ठिकाण गाठावे लागत आहे. संबंधित विभागाचा दिरंगाईपणा एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता बळावली आहे.
एमआयडीसी भागातून अमरावती शहराकडे जाणारा मुख्य व वर्दळीचा मार्ग डांबरीकरणाने वाहतुकीसाठी तयार झाला आहे. दीड वर्ष या रस्त्याचे काम सुरू होते. एमआयडीसीपासून ते बडनेरापर्यंत पथदिवे नसल्याने शेकडो कामगारांना कामावर किंवा घरी जाताना अंधारातूनच जावे लागतात. सायकलस्वार व पायदळ जाणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. एमआयडीसीत महिलावर्ग रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात जातात. बऱ्याच महिला या रस्त्याने पायदळ घरी जातात. अमरावती- बडनेरा शहरासह लगतच्या बऱ्याच खेड्यांतील लोक एमआयडीसीत कामासाठी येतात. यामार्गावर सतत वाहनांची वर्दळीने कामगारांना जीवमुठीत ठेवूनच ये-जा करावी लागते. त्यामुळे तत्काळ पथदिवे बसविण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे. या मार्गावरून केवळ कामगारच नव्हे तर बडनेरा, अंजनगाव बारी तसेच इतरही खेड्यांवरील लोक ये-जा करतात. या मार्गावर बऱ्याच संख्येत हॉटेल्स तसेच ढाबे असल्याने रस्त्यालगत श्वानांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे अंधारात श्वानांची भीती निर्माण झाली आहे.