नरेंद्र जावरे
(चिखलदरा) अमरावती : आंतरराष्ट्रीय कुख्यात वाघ तस्कर आदींनसिंह ऊर्फ कल्ला बावरिया अखेर स्टेट टायगर स्ट्राइक फोर्स मध्य प्रदेशच्या जाळ्यात शनिवारी अडकला. चार दिवसांच्या कोठडीत देशभरातील माहिती त्याच्याकडून घेतली जात असताना इतर राज्यांत संपर्क साधून माहिती घेतली जात आहे, तर दुसरीकडे गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांनी आसाममधून अटक केलेल्या आरोपींची कस्टडी मिळविण्यासाठी चंद्रपूर व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत.
दहा वर्षांपूर्वी मेळघाटातील शिकार प्रकरणात सहभाग असलेला आंतरराष्ट्रीय वाघतस्कर कल्ला बावरिया याने देशभरातील कुठल्या राज्यात वाघाची शिकार करून त्याचे अवयव कुठंपर्यंत कुठल्या साथीदारांच्या मार्फत पाठविले, त्याचे धागेदोरे कुठंपर्यंत आहेत यासाठी विविध राज्यांशी संपर्क केला जात असून त्या दिशेने पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती दिल्ली येथून वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आसामच्या आरोपींना चंद्रपूर अधिकारी घेणार ताब्यात
आसामच्या गुवाहाटी पोलिस वनविभागाने संयुक्त कारवाईत केलेल्या वाघ शिकार व तस्करी प्रकरणात गडचिरोली येथे चौकशीसाठी आणलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले. त्यांची कस्टडी ताडोबा प्रकरणात चंद्रपूरच्या अधिकाऱ्यांना आवश्यक आहे. परंतु त्यांना आसामात पोहोचण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने चंद्रपूर तेथील अधिकारी आता गुवाहाटीत जाऊन त्या आरोपींना ताब्यात घेणार आहेत. त्यानंतर येथील तपास सुरू होणार आहे. एकच चमू गुवाहाटीला चंद्रपूर येथून रवाना झाल्याचे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दोन अधिकारी, स्पेशल टास्क फोर्स एक
गडचिरोली व चंद्रपूर ताडोबा प्रकरणांत दोन वेगवेगळे चौकशी अधिकारी असून संयुक्तरीत्या स्पेशल टास्क फोर्स असल्याने दहा लोकांच्या या टास्क फोर्सने दोन्ही प्रकरणांसाठी आरोपींना आणले होते. गडचिरोली येथील चौकशी संपल्यानंतर चंद्रपूर येथे त्यांना कस्टडीत घेण्याची मागणी करण्यात आली होती, जी गडचिरोलीच्या न्यायालयाने नाकारली. त्यामुळे चंद्रपूरच्या तपासासाठी पुन्हा आता आरोपींची कस्टडी गुवाहाटी आसाम येथून घ्यावी लागणार आहे.