नागरिकांमध्ये दहशत : एसआरपीएफ कॅम्प परिसरात स्वच्छ ठेवण्याचे आवाहनअमरावती : वनविभाग बिबट्याचा बंदोबस्त लावण्यासाठी एसआरपीएफच्या ५०० क्वॉर्टर परिसरात यंत्रणा सज्ज केली आहे. मात्र, तरीही बिबट्याने वनकर्मचाऱ्यांच्या नरजा चुकवून पुन्हा एकाची श्वानाची शिकार केली आहे. त्यामुळे नागरिकांमधील दहशत वाढत असल्याचे चित्र आहे. श्वान व वराहांचा सुळसुळाट वाढल्यानेच बिबट आकर्षित होत असल्याने रहिवाश्यांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. वनविभागाच्या उपवनसंरक्षक निनु सोमराज यांच्या मार्गदर्शनात वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के.लाकडे व शिकारी प्रतिबंधक पथकाचे पी.टी.वानखडे, शेख वाहब, अमोल गावराने, फिरोज खान, अमित शिंदे, सतीष उमक, चंदु ढवळे व मनोज ठाकूर यांनी एसआरपीएफ ५०० क्वॉर्टर परिसराला वेढा घातला आहे. वनविभागाने आतिल परिसर व जगंल भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावून बिबट्यांच्या प्रत्येक हालचाली टिपण्याचा प्रयत्न करीत आहे. बिबट्याला पकडण्याकरिता इमारत क्रमांक ११ जवळील नाल्यात व बाहेर दोन पिंंजरे लावली आहेत. तसेच बिबट्या दिसावा म्हणून सर्व परिसरात ६ ते ७ मोठे फोकस सुध्दा लावले आहेत. मात्र, इतका बंदोबस्त असतानाही रविवारी रात्रीत बिबट्याने वनकर्मचाऱ्यांच्या नजरा चुकवून दुसऱ्याच मार्गाने एसआरपीएफ कॅम्प परिसरात प्रवेश करुन एका श्वानाची शिकार केल्याचे लक्षात आले आहे. हे विशेष. पाच दिवसांपुर्वी नागरिकांनी लावलेल्या सीसीटीव्हीत कैद बिबट्याने श्वानाची शिकार केल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्हीत एकदा बिबट कैद झाला आहे. मात्र, दोन दिवसापासून बिबट सीसीटीव्ही कैद झाला नाही. त्यातच पिंजऱ्यारकडेही फिरकला नसल्याचे आढळून आले आहे. सोमवारी ७ वाजता वराहाची शिकारएसआरपीएफ कॅम्प परिसरात सोमवारी सायंकाळी ७ वाजता पुन्हा एका वराहाची शिकार केल्याने नागरिकांमध्ये प्रंचड दहशत निर्माण झाली होती. सायंकाळी शेकडो रहिवाश्यांनी बघ्याची गर्दी करुन आरडाओरड सुरु केल्याने बिबट्याने पलायन केले. वनविभाग कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मात्र बिबट्यांला पाहण्यासाठी परिसरात गर्दी करीत आहेत. कचरा निर्मूलन व भिंतीची आवश्यकताएसआरपीएफ कॅम्पच्या ५०० क्वॉर्टर परिसरात दाट झुडूपे अधिक प्रमाणात आहेत. तसेच रहिवासी परिसरात कचरा व घाणीमुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे श्वान व वराहांची संख्या अधिक प्रमाणात वाढली आहे. नागरिकांनी कचरा निर्मुलनाकडे लक्ष दिल्यास बिबटयाचा वावर कमी होऊ शकतो. असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. त्याकरीता वनविभागाने रहिवाश्यांना पत्र देखील दिलेले आहे. एसआरपीएफ कॅम्प परिसराच्या लगतच जगंल असून तेथे तारेचे कम्पाऊंड आहे. त्यामधूनही बिबट बिनधास्तपणे आत प्रवेश करु शकतो. त्यामुळे परिसराच्या सभोवताल भिंत बांधणे आवश्यक झाले आहे. मागिल काही महिन्यापुर्वी अमरावती विद्यापीठात बिबटचा वावर असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना जीव टांगणीवर ठेवूनच विद्यापीठ परिसरात फिरावे लागते होते. बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी लोकमतने सातत्याने वृत्त संकलनातून पाठपुरावा केला होता. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने १ कोटी खर्च करुन तत्काळ भिंत बांधली. तेव्हापासून बिबट्याचा वावर बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे आढळून आले आहे. बिबट्याशी सामना झाल्यास काय करावे?बिबट्याचा अचानक आमनासामना झाल्यास सर्वात आधी आपण शांत राहण्याचे प्रयत्न करावे. बिबट्याला पाहून आपण आक्रमक होऊ नये, बिबट हा माणसाला घाबरणार वन्यप्राणी आहे. मात्र माणुस घाबरल्यावर आक्रमक झाल्यास तो त्यापेक्षाही आक्रमक होऊन हल्ला सुध्दा करु शकतो. त्यामुळे शांत राहील्यास बिबट स्व:ताहा निघून जावू शकतो. बिबटच्या अवतीभोवती गराळा घालू नये, त्याचा जगंलात जाणारा मार्ग मोकळा ठेवावा. बिबट्यांने शिकार केल्यास त्याला शिकार खाऊ द्यावी. त्याला पळवून लावण्याचे प्रयत्न करु नये. अन्यथा तो परत शिकारीच्या शोधात येवू शकतो. बिबट्यांसोबत शावक असल्यास तो आक्रमक होवू शकतो. अशावेळी त्यांच्याजवळ जाणे अथवा पळून लावणे अत्यंत धोकादायर ठरु शकते. अशी माहिती वन्यजीव अभ्यासक स्वप्निल सोनोने यांनी दिली. बिबट आढळल्यास काय करावे?बिबट दुरवर आढळून आल्यास सुरक्षित ठिकाणावरुन त्यांच्याकडे लक्ष ठेवावे, जोरजोऱ्यात आरडाओरड करावा अथवा शक्य असल्यास फटाके फोडून त्याला पळवून लावु शकतात. बिबट्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करु नये. तसेच त्याला दगडे मारु नये. अशा प्रसंगी तो आक्रमक सुध्दा होवू शकतो.
वनविभागाची नजर चुकवून बिबट्याने पुन्हा केली शिकार
By admin | Published: March 31, 2015 12:29 AM