अमरावती : तितर पक्ष्याच्या शिकारी प्रकरणात अटक केलेल्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. १५ फेब्रुवारी रोजी वडाळी वनपरिक्षेत्रातील इंदला बिटमध्ये तितरची शिकार करताना दोन आरोपींना वनविभागाने अटक केली होती. या कारवाईमुळे पोहरा व चिरोडी भागातील शिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.पोहरा-चिरोडी भागातील जंगल हे संवेदनशील असून तेथील राखीव वन्यक्षेत्र चिरोडीत अनेकदा मोर, नीलगाय, चितळ, हरिण व अन्य वन्यजीवांच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत. वनविभागाचा शिकाऱ्यांवर वचक नसल्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढल्याचेही दिसून येत होते. मात्र, काही दिवसांपासून वनविभागाने जंगलात गस्त वाढवून लक्ष वेधल्यामुळे १५ फेब्रुवारी रोजी तितरची शिकार करताना दोघांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले. इंदला बिटमधील वनखंड क्रमांक ७१ मध्ये वन्यप्राणी व पक्षांची शिकार करण्यासाठी शिकारी जंगलात शिरल्याची माहिती वनरक्षक पी.बी. शेंडे यांना मिळाली होती. त्यानुसार शेंडे यांनी काही वनकर्मचाऱ्यांना घेऊन इंदला बीट भागातील जंगलात शिकाऱ्यावर पाळत ठेवली. दरम्यान शिकारी बळीराम निकम पवार (७०) व उमेद्र बळीराम पवार (३२) यांनी पक्ष्यांच्या शिकारीसाठी जाळे लावल्याचे आढळून आले. जाळ्यात एक तितर पक्षी अडकून मरण पावल्याचे दिसून आले. वन कर्मचाऱ्यांनी याबाबत माहिती पोहरा वनपाल विनोद कोहळे यांना दिली असता, काही वेळात वन कर्मचाऱ्यांचा ताफा इंदला जंगलात दाखल झाला. वनकर्मचाऱ्यांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याजवळील लोखंडी फासे, नायलॉन दोरीचे जाळे व पेटी फासे जप्त केले. वनविभागाने आरोपीविरुध्द वन्यजीव संरक्षण कायदा अधिनियम १९९२ च्या कलम ९, ३९, (१), अ, ड, व भारतीय वनअधिमियम १९२७ च्या कलम २६(१)(आय) नुसार गुन्हे नोंदविले आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोंघांनाही तीन दिवसांची वनकोठडी सुनावली. १७ फेब्रुवारी रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीत मागणी वन कर्मचाऱ्यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने १ मार्चपर्यंतची कोठडी मंजूर केली.
शिकाऱ्यांचे धाबे दणाणले$$्रिपोहरा-चिरोडी वन परिसर : दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी
By admin | Published: February 20, 2016 12:48 AM