फोटो पी १८ खंडूखेडा / चिखलदरा फोल्डर
अमरावती : चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे व चिखलदरा तालुक्यात गुरूवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने वातावरणात कमालीचा गारवा पसरला. खुंटीवरील स्वेटर, मफलर पुन्हा निघाले. सायंकायपर्यंत वातावरणात गारवा होता.
चिखलदरा, खंडूखेडा येथे गार
चिखलदरा : येथे गुरुवारी दुपारी २:२० वाजताच्या दरम्यान बोराच्या आकाराच्या गारा कोसळल्या. तालुक्यातील खंडूखेडा येथे दुपारी १२ च्या सुमारास तुफान गारपीट झाली. पर्यटनस्थळी दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पर्यटन स्थळ गारठले आहे.
गुरुवारी दुपारी अचानक काळेकुट्ट ढग दाटून आले. विजांच्या कडकडाटात अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर १० ते १५ मिनिटापर्यंत बोराच्या आकाराचे एवढ्या गारांचा सडा कोसळू लागला. वन उद्यान, पांढरी, रेंजर कॉलेज व जंगलात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. नगरपालिकेचा वार्ड असलेल्या पांढरी भागात गारांचे थर दोन तासांपेक्षा अधिक वेळ साचून होते. परिसर पूर्णता पांढरा झाल्याचे स्थानिक रहिवासी नामदेव खडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दोन दिवसांपासून वातावरणात कमालीची घट झाली असून सर्वत्र परिसर गारठला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटक सुद्धा रात्रंदिवस गरम कपडे घालण्यासह दिवसासुद्धा शेकोट्या पेटवून बसले आहेत.
--------
नांदगाव तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस.
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात कनी मिझार्पूर, नांदगाव खंडेश्वर, शिवणी रसुलापुर व परिसरातील गावात गुरूवारी सकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडला. काही गावात तुरळक प्रमाणात गार पडली. हरभरा कापणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली. काही शेतक-यांनी सवंगनी केलेला हरभरा जमिनीवर पडून होता. गंजी झाकण्यासाठी शेतक-यांना धावपळ करावी लागली.
----------
चांदूर रेल्वेत पावसाच्या सरी
चांदूर रेल्वे : येथे गुरुवारी दुपारी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. शहरात पावसाळी वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. सध्या शेतकºयांच्या शेतात गहू, हरभरा, भाजीपाला, संत्रा ही पिके आहेत. या पिकांना पाऊस व वातावरणापासून धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा विवंचनेत सापडला आहे.
---------------
धामणगाव तालुक्याला यंदाही अवकाळीचा फटका
धामणगाव रेल्वे : सहा वर्षांपासून तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकाला अवकाळीचा फटका बसत असून गुरुवारी झालेल्या अवकाळीमुळे सोंगणी केलेला एक हजार हेक्टरातील हरभरा जमीनदोस्त झाला तर तीनशे हेक्टरातील गहू झालेल्या तुरळक गारपीट व वादळी पावसाने झोपला आहे.
------------