अंजनगाव सुर्जी (अमरावती) : आपल्या प्रेम प्रकरणात पती अडथळा ठरत असल्यामुळे पत्नी, पत्नीचा मामे भाऊ व प्रियकराच्या मदतीने पतीला संपविल्याचा धकादायक प्रकार रविवारी दुपारी ३ वाजतादरम्यान उघडकीस आला. ही घटना अंजनगाव तालुक्यातील कापूस्तळणी येथे घडली. रहिमापूर पोलिसांनी सोमवारी पत्नीसह प्रियकराला अटक केली असून, मामेभाऊ फरार आहे.महेंद्र ईश्वरदास इंगळे (३५) मृताचे नाव असून, याची आरोपी पत्नी सोनाली महेंद्र इंगळे (३३) हिचे घराच्या बाजूला राहत असलेल्या सचिन हरिदास इंगळे (३१) चुलत दिरासोबत दोन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. याची कुणकुण पतीला लागली होती. मे महिन्यात मृत महेंद्र इंगळे रोजगार मिळण्याकरिता बाहेरगावी गेला होता. तो १९ मे रोजी परत आला व त्याच दिवशी त्याचा राहत्या घरात पत्नी व चुलत भाऊ यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने घरातील खलबता उचलून महेंद्रच्या डोक्यात दोन-तीन वार करण्यात आले. त्यामध्ये महेंद्र इंगळे जागीच ठार झाला. रात्रीची वेळ असल्यामुळे तिघांनी घरातील अंगणात मोठा खड्डा खोदून त्याचा मृतदेह खड्ड्यात पुरला.१० जून रोजी सकाळी या घटनेची कुणकुण रहिमापूरचे ठानेदार सचिन शिरसाठ यांना लागताच मृताच्या आईला आपल्या मुलाबाबत विचारणा केली असता, माझा मुलगा काही दिवसांपासून घरी नाही, असे सांगितले. तसेच माझ्या सुनेचे व घराशेजारच्या सचिन इंगळेसोबत अनैतिक संबंध असल्याचेही त्या म्हणाल्या. व यांनी माझ्या मुलाला मारून टाकले असेल, असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच वाढला. त्यानंतर महेंद्रबाबत सचिन इंगळे यांना विचारणा केली असता आधी उड़वा उडवी चे उतरे पोलिसांना मिळत होती. दोघांना रहिमापूर पोलीस ठाण्यात आणून पोलीस खाक्या दाखवाताच आम्हीच महेंद्र इंगळेचा खून केल्याची कबुली दिली. तसेच आमच्यासोबत सोनाली इंगळे हिचा मामेभाऊ सुनील रामकृष्ण तायडे (४२) सुद्धा असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही आरोपींना रहिमापूर पोलिसांनी घटनास्थळी नेऊन महेंद्र इंगळेचा मृतदेह बाहेर काढला. सदर घटना २३ दिवसांनतर उघडकीस आल्यामुळे मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. तिन्ही आरोपींवर भादंविच्या कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी जैनकुमार मीणा, तालुका दंडाधिकारी पुरुषोत्तम भुसारी उपस्थित होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन राहाटे, पोलीस कर्मचारी सुधाकर चव्हाण, प्रमोद इचे, संजय टाले, संदीप खेडकर, नीलेश तोटे, सुजाता सातरोटे, सतीश डाहाके करीत आहे.
पत्नीचा मामेभाऊ फरारया खुनातील तिसरा आरोपी पत्नीचा मामेभाऊ सुनील रामकृष्ण तायडे याला पोलीस पकडणार असल्याचे माहिती होताच तो फरार झाला आहे. रहिमापूर पोलीस त्याचा शोध घेत आहे.
मृत महेंद्र इंगळे यांच्या घराशेजारच्या लोकांकडून या खुनाची गुप्त माहिती मिळाली. त्या अनुषंगाने तपास केला असता, सदर प्रकार उघडकीस आला.- सचिन शिरसाठ, ठाणेदार, पोलीस ठाणे, रहिमापूर