अमरावती : डिपार्टमेंटमधील काही मोजके लोक नेत्यांप्रमाणे वर्दीचा गैरवापर करीत आहेत. चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र, त्या तरुणीला सहिसलामत आणून तिच्या पालकांच्या स्वाधिन करून मी माझे कर्तव्य पूर्ण केले. ते मी करत राहील, अशा धमक्यांना, केसेसला घाबरणाऱ्यांमधली मी नाही, असा दावा खासदार नवनीत राणा यांनी मंगळवारी केला.
एका व्यक्तीच्या फिर्यादीवरून खा. राणा यांच्याविरोधात राजापेठ पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. त्यावर प्रतिक्रिया देताना त्या बोलत होत्या. कुठल्याही माध्यमातून राणा दाम्पत्याविरूद्ध गुन्हे नोंदविले गेले पाहिजे, अशा काहींचा स्पष्ट इंटरेस्ट आहे. मात्र, एखाद्या मुलीला कुणी गुमराह करत असेल, तिला पळवून नेत असेल, तर तिची सोडवणूक करून तिला तिच्या पालकांच्या स्वाधिन करणे, माझे कर्तव्य आहे. तो आपला अधिकार देखील आहे. आपण न्यायाची लढाई लढत आहोत, जो काम करतो, त्याला विरोध होतोच. मात्र, अशा कुठल्याही गोष्टीला आपण घाबरत नसल्याची स्पष्टोक्ती खा. राणा यांनी केली. ज्या विशिष्टधर्मिय व्यक्तीने आपल्याविरोधात तक्रार नोंदविली, ती योग्य असेल, तर निश्चितपणे ती ऐकली जाईल, असे राणा म्हणाल्या.
त्या पोलीस पत्नीला मी ओळखत नाही
एका पोलीस पत्नीने आपल्याविरूदध पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या आंदोलन केले, तक्रार देखील केली, ते माध्यमांतून समजले. मात्र, त्या पोलीस पत्नीला आपण ओळखत नसून त्या शिवसेनेच्या जिल्हा कार्यकर्ता असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. आपण न्यायाची, हक्काची लढाई लढत आहोत. ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, अशांनी आपल्यावर टीका करू नये, अशा त्या म्हणाल्या.