अमरावती : गुढीपाडवा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी शेतीच्या कामाला सुरुवात केली जाते. गुढीपाडवा जवळ आला की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून आपल्या शेतीच्या कामाकरिता शेतात सालगडीची शोधाशोध सुरू होते. गुढीपाडवा सणाला शेतातील सालगड्याचा करार होऊन शेतीकामाला सुरुवात केली जाते. यावर्षी सालगड्याचा वर्षाचा पगार एक लाखाच्या पुढे गेला आहे. गतवर्षी ८५ हजार रुपयांपर्यंत सालगड्याचा करार गेला होता. यंदा मात्र यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वाढती महागाई लक्षात घेता आम्हाला परवडत नाही, असा सूर सालगड्यांतून निघत आहे. सालगड्याचा वर्षभराचा कौटुंबिक संसार या पैशातून चालवला जातो. सतत पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी, पिकांना फटका, यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सालगाड्याचा पगार परवडत नसून, शेतीतील उत्पन्नही घटत चालले आहे. यामुळे शेतकरी आपली शेती भागिदारीने व निम्म्या हिशाने (बटाई) देत आहेत. शेतकऱ्यांना शेतातील कामाला सालगडी मिळत नसल्याने बैलजोडी, पशुधनाची विक्री करून ट्रॅक्टरवरील यांत्रिकीकरण शेतीकडे वळावे लागत आहे. त्यामुळे ट्रॅक्टरची संख्या वाढत असून, ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकऱ्यांकडून भर दिला जात आहे. सालदाराची संख्या कमी झाल्याने शेतीच्या कामाकरिता परराज्यातून सालगडी आणावे लागत आहे.
बॉक्स
मजूर मिळेनात
शेतात वर्षभर सालगडी म्हणून काम करण्यापेक्षा शहरातील कामाकडे त्यांचा कल आहे. छोटे-मोठे काम करून अधिक पैसे मिळत असल्याने सालगडी म्हणून काम करण्याची मानसिकता दुर्धर झाली आहे. त्यामुळे सालगडी मिळणे कठीण झाले आहे. शेतीच्या कामाला दिवसाची मजुरी वाढवली आहे. पुरुषांना ५००, तर महिला शेतमजुरांना दिवसाला २०० ते २५० रुपये मजुरी झाली आहे.