श्यामकांत पाण्डेय
धारणी : मेळघाटातील तीनशे गावात मोहा बँक स्थापन करून सर्वसामान्य आदिवासी जनतेची आर्थिक उन्नती करूनी त्यांना लखपती बनविण्याचा संकल्प नवनियुक्त प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांनी मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत केला.
मेळघाटात मोहा फुलाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र, मोहा फुलाचे नियोजन करण्याचे तंत्र नसल्यामुळे आलेली मोहाफुले अत्यल्प दरात विकण्याची आदिवासींची संकल्पना मोडीत काढून त्यांना मोहाफुलाच्या माध्यमातूनच लखपती करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. मोहाफुलाचे साधारण उत्पादन फेब्रुवारी महिन्यात सुरू होते. उन्हाळापर्यंत मोहाफुले वेचली जातात. मात्र, आर्थिक चणचण दूर करण्यासाठी वेचलेली मोहाफुले अत्यल्प दरात विकण्याची आदिवासींची प्रथा असल्याने त्यांना योग्य दर मिळत नाही. त्यामुळे हेच मोहाफुले तीन-चार महिने साठविल्यानंतर चढ्या दराने विक्री करण्याची संधी देण्याचा नवीन फंडा प्रकल्प कार्यालयाच्या मानस असल्याचे वाघमारे म्हणाले. त्याकरिता प्रत्येक गावात मोहा बँक स्थापित करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. या कामात प्रसिद्धी माध्यमांनी योग्य मार्गदर्शन करण्याचेही त्यांनी सुचविले.
आदिवासी क्षेत्रातील होतकरू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना परदेशात शिक्षणाकरिता शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांची आर्थिक अडचण दूर करण्याचे काम आदिवासी प्रकल्प विभागामार्फत करण्यात येणार असून, त्याचा लाभ घेण्याचे आव्हानसुद्धा त्यांनी यावेळी केले. धारणी येथील सहायक प्रकल्प जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी नुकतेच येथील कारभार सांभाळला आहे. आल्या-आल्या त्यांनी आदिवासींचे आर्थिक उन्नतीसाठी आखलेल्या उपायोजना कितपत सार्थक ठरेल, हे येणारा काळ ठरवेल, मात्र त्यांची नवीन संकल्पना आदिवासींच्या आर्थिक उन्नतीसाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे. प्रकल्प अधिकारी कार्यालयात अवधी आयोजित पत्रकार परिषदेत मोठ्या संख्येत पत्रकार बंधू उपस्थित होते.