अमरावती : राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांमध्ये स्वराज्य निर्मितीची प्रेरणा जागवली. छत्रपती शिवरायांनी लोककल्याणकारी, न्यायपूर्ण राज्याची निर्मिती करून जगापुढे आदर्श निर्माण केला. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श मूल्यांची कृतीतून जोपासना करण्याचे काम युवकांनी करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी येथे केले.
राज्यस्तरीय घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा आयोजन समिती, महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड व वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय राष्ट्रमाता जिजाऊ सन्मान पालकमंत्री ठाकूर यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. रहाटगाव रस्त्यावरील जिजाऊ लॉन येथील स्मृतीशेष सचिन चौधरी सभागृहात हा कार्यक्रम झाला. पालकमंत्री ठाकूर यांनी कोरोनाकाळात केलेले कार्य, महिलांच्या उत्थानासाठी केलेले कार्य, त्यांचा संघर्षमय प्रवासासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय संघटिका मयुरा देशमुख अध्यक्षस्थानी होत्या. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, प्राचार्य वर्षा देशमुख, अरविंद गावंडे, अविनाश कोठाळे, आश्विन चौधरी, कांचन उल्हे, डॉ. अंजली ठाकरे, किर्तीमाला चौधरी, डॉ. तुषार देशमुख, मनाली तायडे, लीनता पवार, अमर वानखडे, सुमीत रिठे, अजित काळबांडे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, छत्रपती शिवरायांनी लोककल्याणकारी राज्य व आदर्श जीवनमूल्ये समाजाला दिली. या मूल्यांची जोपासना होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या संवैधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. संस्थेतर्फे आयोजित विविध जिल्हास्तरीय स्पर्धांचे पारितोषिक वितरणही यावेळी झाले.