वादग्रस्त जागांची मोजणी करण्याचे आदेश : अनु. जाती, जमाती आयोगाच्या अध्यक्षांची चिंचोलीला भेटचांदूरबाजार : ब्राह्मणवाडा (थडी) ग्रामपंचायतअंतर्गत चिंचोली येथील बौद्ध विहार व हनुमान मंदिर अनुयायात कित्येक दिवसांपासून जागेचा वाद आहे. याचे पर्यावसान गेल्या वर्षी दोन्ही बाजूच्या लोकांत हाणामारी होऊन गावात तणाव निर्माण झाला होता. आता पुन्हा या वादात वादग्रस्त जागेवरील वृक्षारोपणामुळे भर पडली तर दलित पँथरच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बहिष्कार टाकल्याच्या तक्रारीने हे प्रकरण थेट अनु. जाती जमाती आयोगापर्यंत पोहोचले. बहिष्काराच्या तक्रारीत खरच तत्थ असेल तर ही बाब गंभीर असल्यामुळे आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थूल यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकासह चिंचोली गाठली व दोन्ही बाजूकडील नागरिकांना पाचारण करुन चिंचोली येथील जि.प. मराठी शाळेत बैठकी घेतली. यात जिल्हाधिकारी किरण गित्ते, ग्रामीण पोलीस अधीक्षक लख्मी गौतम, चांदूरबाजारचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार सैफन नदाफ, सरपंच नंदकिशोर वासनकर उपस्थित होते. आयोगाचे अध्यक्ष थूल यांनी दोन्ही बाजू जाणून घेतली. दलित समाज मूलभूत सोयीपासून खरच वंचित आहे काय? हे जाणून घेतले व खरच बहिष्कार आहे काय हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना गोपनीय चौकशी करण्याचे आदेश दिले. यात तत्थ आढळून आल्यास त्या गावातील सर्व योजना बंद करण्याची शिफारस शासनाकडे करण्याचा इशाराही देऊन टाकला. येथे प्रश्न केवळ बहिष्काराचा नसून हनुमान मंदिर व बौद्ध विहार यांचे मधल्या जागेचा असल्याचे या बैठकीत निष्पन्न झाले. त्यासाठी या जागेची सन १९१२ पासून शासकीय रेकॉर्डनुसार मोजणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी यावेळी महसूल अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत पिण्याच्या पाणी मिळण्याबाबत काहीच वाद नसल्याचे निष्पन्न झाले. तर किराणा व पीठ गिरणीबाबत तक्रार करण्यात आली. यावर समाज कल्याण विभागाकडून दलितांना पीठ गिरणी देण्याची शिफारस आयोगाच्या अध्यक्षाकडून समाज कल्याण विभागाला करणार असल्याचे सांगितले. बैठकीला पत्रकारांना मज्जाव करण्यात आला होता. याबाबत विचारणा केली असता कलेक्टर साहेबांचे तसे आदेश असल्याचे शिरजगाव कसब्याचे ठाणेदार चौगुले यांनी सांगितले.
बहिष्कार सिद्ध झाल्यास शासकीय योजना गुंडाळण्याची शिफारस
By admin | Published: August 18, 2015 12:28 AM