अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी शासनाकडून कडक निर्बंध लागू आहेत. हा निर्णय आनंदाने घेतलेला नाही. मात्र, कोरोनाची साखळी तोडणे हे उद्दिष्ट असून, नागरिकांच्या जीवाला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त राखून नियम पाळत कोरोनाविरुद्धच्या लढाईत साथ द्यावी, असे भावनिक आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी केले.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ही साथ रोखण्यासाठी शासन-प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य असल्याशिवाय हे संक्रमण रोखता येणार नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत नागरिकांनी स्वयंशिस्त ठेवणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी नागरिक अद्यापही पुरेशी काळजी घेत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशाप्रकारे दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना रोखणे ही आता शासन, प्रशासनासह सर्वांचीच जबाबदारी आहे. बेशिस्तीमुळे साथ वाढत राहिली तर नाईलाजाने निर्बंध आणखी कठोर करण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला. औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे ही कामे होतच आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढू नये म्हणून निर्बंध लागू करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधक उपाय ही जीवनशैली व्हावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
बॉक्स
टाळेबंदी व्यवस्थापनासाठी निधीची तरतूद
शासनाकडून सर्व जिल्ह्यांसाठी सुमारे ३,३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येणार आहे. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासन व इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क व इतर देय रकमा या एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
बॉक्स
आर्थिक दुर्बल घटकांना सहाय्य
कोविडकाळात रोज नव्या अडचणी उभ्या राहत आहेत. या अडचणींवर शासन गेल्या वर्षभरापासून मात करत आहे. सगळीकडे कोरोना प्रतिबंधक उपचार उपलब्ध करून देतानाच, संचारबंदीमुळे वंचित व आर्थिक दुर्बल घटकांचे नुकसान होऊ नये म्हणून आर्थिक सहाय्य देण्याची तरतूदही शासनाने केली टाळेबंदीत समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.