अमरावती : सोयाबीनवरील खोडमाशी ही अशी कीड आहे जिचा प्रादुर्भाव उगवणापासून कापणीपर्यंत राहतो. ६० टक्क्यांपर्यंत पिकाचे नुकसान होते. त्यामुळे सोयाबीन उगवणाच्या १० ते १५ दिवसांत कीडीचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असल्याचे पीकेव्हीच्या प्रादेशिक संशोधक केंद्राचे कृषीशास्त्रज्ञ डॉ. अनिल ठाकरे यांनी सांगितले.
या किडीच्या प्रौढ माश्या लहान चमकदार काळ्या रंगाच्या व त्यांची लांबी २ मिमी असते. अळी बिनपायाची फिक्कट पिवळी व ३ ते ४ मिमी लांब असते. कोषावस्थेत फांदी किंवा खोडात आढळते. पूर्ण वाढ झालेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी प्रौढ माशीला बाहेर जाण्यासाठी खोडाला जमिनीलगत किंवा मोठ्या झाडाच्या वरच्या भागात छिद्र करते व हे छिद्र भुरकट लाल रंगाचे असते. मादी माशी पेशीत फिक्कट पिवळसर ८० ते ८५ अंडी घालते. यातील अळी १० ते १५ दिवस राहते. ७ ते १० दिवसांनी कोषावस्थेत जाते. कोष फिक्कट तपकिरी रंगाचे असतात. एकूण ११ ते १३ दिवसांत प्रौढावस्था पूर्ण होते.
खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या मुख्य शिरांद्वारे खोडात शिरतात व आतील भाग पोखरतात. खरिपात झाडे ९० ते १०० टक्के कीडग्रस्त होतात. झाडाची खोडे ७० टक्के पोखरल्याने पिकाचे नुकसान होत असल्याची माहिती कृषीशास्त्रज्ञ डॉ. सतीश निचळ व डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी सांगितले.
बॉक्स
हे व्यवस्थापन आवश्यक
प्रत्येक क्षेत्रात आठ दिवसांत पेरणी आटोपून शिफारशीप्रमाणे नत्राची मात्रा द्यावी. पेरणीपूर्वी रासायनिक बुरशीनाशकासोबत थायमिथोकझान ३० टक्के एफ.एस या कीटकनाशकाची १० मिली प्रतीकिलोप्रमाणे १ ते ८ दिवस अगोदर आपले सवलतीनुसार बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. पेरणीनंतर १५ दिवसांनी फोमसिटचे किंवा रेडिमेड पिवळे चिकट सापळे एकरी ६४ याप्रमाणे ८ ते १० मीटर अंतरावर लावावे.
बॉक्स
ही फवारणी आवश्यक
सोयाबीन पेरणीनंतर प्रथम थायमिथोक्झान १२.६ टक्के अधिक लाम्ब्डा सायहलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी हे २.५ मिली १० लीटर (५० मिली/एकर) किंवा इथिऑन ५० टक्के ईसी हे ३० मिली हे १० लीटर (६००/मिली/एकर) याप्रमाणे फवारणी करावी. ३० ते ३५ दिवसांनी दुसरी फवारणी क्लोरानट्रनीप्रोल १८.५ टक्के एससी हे ३ मिली १० लीटर पाण्यात किंवा इंडोक्साकार्ब १५.८ टक्के ईसी हे ६.७ मिली याप्रमाणे करावी.
बॉक्स
चवथी फवारणी आवश्यक
६० ते ६५ दिवसांनी चवथी फवारणी इमामेकटीन बेंझोएट १,९ टक्के ईसी हे ८.५ मिली १० लीटर पानी (१७० मिली/एकर) या प्रमाणे करावी. या फवारणीमुळे सोयाबीनवरील इतर किडींचेही व्यवस्थापन करता येते. हे प्रमाण १० लीटर पाण्याच्या साध्या पंपाचे आहे. पॉवर स्फ्रेयरने फवारणी करायची झाल्यास कीटकनाशकाचे प्रमाण तीनपट करावे, असे अनिल ठाकरे यांनी सांगितले.