चांदूर रेल्वे : कोविड-१९ च्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी आपत्कालीन पावले उचलणे अपरिहार्य झाले आहे. त्यासाठी राज्य शासनाने 'ब्रेक द चेन'अंतर्गत नियमावली लागू केली आहे. संपूर्ण अमरावती जिल्ह्यातही १५ मे पर्यंत नियम लागू आहे. सदर नियमाच्या अधिन राहूनच लग्नसोहळे पार पाडावे, अन्यथा थेट कारवाई होईल, असा इशारा तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी दिला.
जिल्ह्यासह चांदूर रेल्वे तालुक्यात सुध्दा कोरोना रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी, विवाह समारंभ साजरे करतांना ते एकच समारंभ म्हणून एकाच हॉलमध्ये केले जावेत आणि कमाल दोन तासात हे कार्यक्रम करताना कमाल २५ व्यक्ती उपस्थित राहू शकतील. याचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधांचा भंग करत असलेल्या कुटुंबांना ५० हजार रुपयांचा दंड आकारला जाईल आणि संबंधित हॉल किंवा समारंभ स्थळ कोविड - १९ ची आपत्ती आहे तोवर बंद केले जाईल असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद आहे. अशातच याच लग्नाच्या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे मंगळवारी रात्री चांदूर रेल्वे शहरातील एका व्यक्तीकडून ५० हजारांचा दंड वसुल केल्याची कारवाई करण्यात आली. नगर परिषद (शहर हद्दीत) किंवा तहसील कार्यालय (ग्रामिण हद्दीत) येथून लग्नाची परवानगी काढून घ्यावी असे आवाहन तहसिलदार राजेंद्र इंगळे यांनी केले आहे.
बॉक्स
गृहविलगीकरणातील रूग्णांवर कटाक्ष
होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोरोना बाधितांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. सदर व्यक्ती त्या कालावधीत बाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक अथवा फौजदारी कारवाई करून त्याची कोविड सेंटरला रवानगी करण्यात येईल, असे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी म्हटले.