राष्ट्रीय वेटलिफ्टरची व्यथा : प्रणव खुळेचा क्रीडा विभागावर आक्षेपलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बालेवाडी पुणे येथे सन २०१६-१७ मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय पावर लिफ्टिंग स्पर्धेत देशातून प्रथम स्थान पटकावणाऱ्या प्रणव खुळे याला क्रीडा विभागाद्वारे दिले जाणारे २५ गुण न मिळाल्याने त्याने राष्ट्रीय स्तरावर मिळविलेले सुवर्ण पदक परत करण्याचा निर्धार केला आहे. बडनेरा येथील राजेश्वर युनियन विद्यालयाचा इयत्ता बारावीचा विद्यार्थी प्रणव खुळे याने १२० किलो वजनगटात राष्ट्रीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत देशातून प्रथम क्रमांक पटकावला होता. त्याचप्रमाणे २९ मे ते १ जून या कालावधीत चंद्रपूर येथील इंडियन पावर लिफ्टिंग फेडरेशन आणि विदर्भ पावर लिफ्टिंग असोसिएशनतर्फे आयोजित सब ज्युनिअर गटाच्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत १२० प्लस वजन गटात देखील प्रणव खुळे याने देशातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मात्र, राष्ट्रीय पातळीवर सिल्व्हर व गोल्ड मेडल पटकावणाऱ्या या विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेत क्रीडा गुण दिले गेले नाहीत. क्रीडा विभागाने त्याचा प्रस्ताव शिक्षण मंडळाकडे न पाठविल्याने त्याला हे गुण मिळू शकले नाहीत. नागपूर विभागाने मात्र याच क्रीडा प्रकारातील खेळाडुला अतिरिक्त २० गुण दिले आहेत. त्यामुळे शासकीय पातळीवर झालेली ही चूक त्वरित सुधारून २५ गुण न दिल्यास सुवर्ण पदक शासनाकडे परत करण्याचा इशारा प्रणव याने दिला आहे. खेळावर लक्ष केंद्रीत केल्याने विद्यार्थ्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. नंतर शासन गुण देण्यास टाळाटाळ करते, असा आरोपही खुळे याने केला आहे.
क्रीडा गुण न मिळाल्यास ‘सुवर्ण पदक’ परत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2017 12:08 AM