अमरावती/मुंबई - केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची विरोधकांकडूनही प्रशंसा करण्यात येते. रस्ते बांधणे आणि देशातील वाहतूक व्यवस्थेसाठी दिवस-रात्र एक करत काम करणारे मंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळे, त्यांचे विधान प्रमाण मानले जाते, त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेली विधाने चांगलीच चर्चेत आहेत. यापूर्वी उडणारी बस आणि पेट्रोल हद्दपार होणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता, पुन्हा एकदा त्यांनी दिलेलं उदाहरण चर्चेचा विषय बनलं आहे.
नितीन गडकरी यांनी अमरावती(Amravati) येथे आयोजीत एका कृषी मार्गदर्शन शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना शेतमालाचे उत्पादन आणि विक्री याबाबत मार्गदर्शन करताना नितीन गडकरींनी यांनी दिलेल्या उदाहरणामुळे ते सोशल मीडियावर चर्चेत आले. देवाचा आशीर्वाद असतोच, पण आपले प्रयत्नही असायला हवेत. आपले प्रयत्न असल्याशिवाय काहीच होत नाही, असे त्यांना सांगायचे होते. त्यासाठी, त्यांनी दिलेलं उदाहरण ऐकून उपस्थितांना हसूल आले. तर, सोशल मीडियावर गडकरी ट्रोल झाले.
शेतमालाच चांगलं उत्पादन केलं चांगलं पॅकींग केलं तर तुम्ही पिकवलेली संत्री देखील विदेशात जाईल. नाही तर मग अस व्हायला नको देवाचा आर्शिवाद आहे आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरग कसं होणार, असं नितीन गडकरी म्हणाले. त्यांचे हे व्यक्तव्य ऐकून सभागृहात हशा पिकला. शेतमालाला मार्केच मिळावे यासाठी तुम्हालाही काही इनिशीटीव्ह घ्यावं लागेल असा सल्लाच गडकरींनी शेतकऱ्यांना दिला. मात्र, या उदाहरणाची चर्चा चांगलीच रंगली.
विदर्भात शुगर इंस्टीट्यूटची शाखा
शेतकऱ्यांनी आता परंपरागत पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. भाताच्या शेतीतून बाहेर पडण्याची गरज आहे, असे सांगत विदर्भातील शेतीचा प्रवास आता भाताकडून उसाकडे नेण्याचे संकेत, मान्यवरांच्या भाषणातून मिळाले. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा विदर्भात होणार असल्याचे सांगत या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले.
नागपूर-अमरावती-नरखेड मेट्रो लवकरच
मेट्रोचा प्रवास हा बसपेक्षा स्वस्तात पडतो. त्यामुळे अमरावती-नागपूर-नरखेड असा नवा मेट्रोचा मार्ग प्रस्तावित आहे. संपूर्ण विदर्भात मेट्रोचे जाळे विणण्याचे काम हाती घेतले जाईल, असे ना. गडकरी यांनी सांगितले. आठ डब्यांची मेट्रो असणार आहे. त्याकरिता रेल्वे प्रशासनाने तयारी दर्शविली आहे. ताशी १४० ते १५० किमीचा मेट्रोचा वेग राहणार असून, यंदा डिसेंबरअखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. गोंदिया, भंडारा, वडसा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला, शेगाव असादेखील पुढील टप्पा मेट्रोचा राहील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
पुढील 5 वर्षात पेट्रोल हद्दपार होईल
नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी मोठं विधान केलं होतं. पुढच्या पाच वर्षांत देशातील पेट्रोल हद्दपार होईल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३६ वा दीक्षान्त समारंभ पार पडला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी, कृषी विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित केले.