प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बुलेट किंवा तत्सम वाहनांच्या सायलेंसरमध्ये बदल करून धडधड आवाज करीत जाणाऱ्या बुलेटवीरांवर वाहतूक शाखेने दंडाचा बडगा उगारला आहे. ध्वनिप्रदूषणात भर घालणाऱ्या त्या मॉडिफाईड बुलेट सायलेन्सरवर आता रोडरोलरदेखील फिरविला जाणार आहे. (If you ride a bike with a ringing sound, be careful, the road roller will crush your silencer.)
रस्त्याने जोराचा आवाज करीत भरधाव जाणाऱ्या बुलेट सध्या नागरिकांची डोकेदुखी ठरत आहेत. दुरूनच या वाहनांचा आवाज यायला लागतो आणि ती जवळ आली की, रस्त्यावरील अन्य दुचाकीचालक विशेषत: वृद्ध आणि शालेय विद्यार्थी घाबरून, भांबावून जातात. त्यातूनच छोटे-मोठे अपघात होत असतात. शहरात कॅम्प, पंचवटी, शिवाजीनगर, व्हीएमव्ही रोड, कठोरा रोड या मार्गांवर अशा दुचाकीस्वारांचा धुमाकूळ असतो. अशांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील १५ दिवसांत २७ वाहनांचे मॉडीफाईड सायलेंसर काढून घेऊन त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मॉडिफाईड सायलेंसर काढून त्याऐवजी दुसरे आवाज न करणारे सायलेंसर लावून घेतल्यानंतरच ती वाहने सोडण्यात येत आहेत.सायलेंसर मॉडिफाय करायला येतो पाच हजारांचा खर्चदुचाकीतून विशिष्ट आवाज येण्यासाठी सायलेंसरमध्ये काही बदल घडवून आणण्यात येतात. त्यासाठी चार ते पाच हजार रुपये खर्च केले जातात. दरम्यानच्या काळात पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे या चालकांना धाक बसल्याचे दिसत आहे. २०२१ च्या ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात २७ वाहनांचे मॉडिफाईड सायलेंसर काढण्यात आले. मोटार वाहन कायद्यातील १९० (२) या तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली. या नियमानुसार १००० रुपये दंड होऊ शकतो. जबर दंड बसल्याशिवाय अशा दुचाकीचालकांना कायद्याचा धाक बसणार नाही.३३ लाखांची बाईक चालविणारा टार्गेटएका तरुणाने तब्बल ३३ लाख रुपयांची दुचाकी घेऊन शहरात धूम माजविली आहे. शहरातील तीनही उड्डाणपूल, पंचवटी ते इर्विन चौक, चपराशीपुरा ते रेल्वे स्टेशन चौकातून तो शहरभर प्रचंड आवाज करणारे मॉडिफाईड सायलेंसर बसवून फिरत असतो. त्याच्या बेदरकार वेगाबाबत शहर वाहतूक शाखेकडे तक्रारदेखील आली आहे. त्यामुळे तो बुलेटराजा पोलिसांच्या रडारवर आला आहे.शहरात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांसंदर्भात वाहतूक शाखेकडे तक्रारी आल्या. सबब, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या व मॉडिफाईड सायलेंसरवर कारवाई करण्यात येत आहे. ज्यांनी आपल्या बुलेटला मॉडिफाईड सायलेंसर लावून घेतले, त्यांनी ते स्वत:हून काढून टाकावेत.- बाबाराव अवचार, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा