लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वन्यजिवांसोबत फोटो, व्हिडीओ, खाऊ घालताना व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड करणे हा गुन्हा आहे. असे केल्यास तुम्हाला कोठडीची हवा खावी लागू शकते, इतकेच नव्हे तर पाच लाखांपर्यंतचा दंडही होऊ शकतो. वन्यजीव कायदा १९७२ नुसार वन्यजीवांसोबत फोटो काढणे, त्यांना खाऊ घालतानाचे व्हिडीओ काढून समाज माध्यमांवर अपलोड करणे, हा गुन्हा असून, असे केल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पोपटाला खाऊ घालणे आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यास तुरुंगवास होऊ शकतो.
वन्यजिवाला खाऊ घालू नकावन्यजिवांना खाऊ घालून आपण पुण्याचे काम करतो, असे नव्हे तर आपण त्यांची सवय बिघडवतो. त्यामुळे भविष्यात ते खाण्यासाठी रस्त्यावर येतात. परिणामी, अपघात होतो. त्यांचे नियमित अन्न म्हणजे फळे, पाने, कंदमुळे खाणे सोडून ते आपण दिलेले अन्न खातात. त्यामुळे त्यांची पचनशक्त्ती बिघडते.
वन्यजिवाशी खेळू नका वन्यजीवासोबत खेळणे, त्याला हाताळणे, त्रास देणे, चिडवणे हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा आहे. एखादा पक्षी सापडल्यास वनविभाग कार्यालयात घेऊन जाणे गरजेचे आहे. मात्र, अशा वन्यजिवासोबत फोटो, व्हिडीओ शेअर करून त्यांचे प्रदर्शन, वन्यजिवांचा पाठलाग हादेखील गुन्हा आहे.
वन्य प्राण्यांना आपण आपले अन्न खायला देतो, हे पुण्याचे काम नाही तर आपण त्यांचा जीव धोक्यात घालतो, हे आपल्याला समजायला हवे. फोटो काढण्यासाठी वन्यप्राण्यांना त्रास देणे कायद्याने गुन्हा आहे. वन्यजीव संवर्धन ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. याचे भान ठेवून इतरांना जागरूक करावे व कुठे असे घडत असल्यास वनविभागाशी संपर्क करावा.- नीलेश कंचनपुरे, वन्यजीव संरक्षक, वॉर संघटना
असे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर टाळा• वन्यजिवांचे प्रदर्शन करणे, त्यांना हाताळत असलेले फोटो, व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर अपलोड करणे हा वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा आहे. • फोटो काढण्यास वन्यजीवाला त्रास देणे हादेखील गुन्हा आहे. त्यामुळे असे फोटो, व्हिडीओ काढल्यास वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग होऊन संबंधित व्यक्ती दंडास पात्र ठरते.• वन्यजीव कायद्यातील तरतुदींचे भान ठेवण्याची गरज आहे.