पोलिसांकडून दहा कारवाया : मद्यविक्री प्रतिष्ठाने बंद झाल्याचा प्रभावअमरावती : राज्य महामार्गावरील मद्य विक्री प्रतिष्ठानातून मद्यविक्री बंद करण्यात आल्यामुळे शहरात अवैध दारू विक्रीला उधाण आला आहे. शहर पोलिसांनी शनिवारी शहरातील दहा ठिकाणी धाडी टाकून लाखो रुपयांची अवैध दारू जप्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महामार्गावर असलेले मद्यविक्रीचे प्रतिष्ठाने शनिवारी बंद करण्यात आले. यामध्ये शहरातील ३८९ दुकाने बंद होती. या निर्णयामुळे एकीकडे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला, तर दुसरीकडे अधिकृत दारू विक्रेत्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यातच दारू प्रतिष्ठाने बंद असल्याचे पाहून मद्यपींचा चांगलाच गोंधळ उडाला होता. शहरातील मुख्य मार्गावरीलच दारू दुकाने बंद झाल्याने अनेकांनी बाजारपेठेतील मद्य दुकांनाकडे धाव घेतली. त्यामुळे शहरातील आतील भागात असणाऱ्या दारू दुकांनामध्ये मोठी गर्दी उसळली. या बंद दरम्यान अवैध दारू विक्रेत्यांची चांदी झाली. मुख्य मार्गावरील दारू दुकान बंद असल्यामुळे अनेकांनी अवैध दारूचे व्यवसाय उघडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी या अवैध दारू विक्रेत्यावर कारवाईचा फास आवळला आहे. शनिवारी वलगाव, खोलापुरी गेट, राजापेठ, भातकुली, फे्रजरपुरा व वलगाव ठाण्याच्या हद्दीतून पोलिसांनी अवैध दारूचा लाखोंचा मुद्देमाल जप्त केले आहे. अशी आहे कारवाईबडनेरा पोलिसांनी अरविंद चंपत वानखडेकडून १३ नग देशी दारूच्या बॉटल जप्त केल्या. फे्रजरपुरा पोलिसांनी संतोष मोहोकार, देवीदास किसन भारद्वाज (रा.परिहारपुरा) यांच्याकडून ४ हजार ४१० रुपयांची दारू जप्त केली. तसेच हर्षल अमरचंद शेंडेकडून १ हजार ५०० रुपयांची दारू जप्त केली. भातकुली पोलिसांनी नकूल सूर्यभान दंदेकडून देशी दारूच्या ८ बाटल्या जप्त केल्या. नीलेश भाष्कर उमाळेकडून १ हजार ४७० रुपयांची दारू जप्त केली. वलगाव पोलिसांनी राहुल भंगवत तसरेकडून ९० नग देशी दारू जप्त केली. खोलापुरी गेट पोलिसांनी भीमराव महादेव आठवलेकडून ८ नग देशी दारू जप्त केली. राजापेठ पोलिसांनी राधेश्याम राजवाडेकडून १० दारूच्या बाटल्या जप्त केल्यात. शिराळ्यातून एक लाख १० हजारांची दारू जप्तगुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पीएसआय प्रवीण पाटील, आशिष देशमुख, एएसआय विधाते, पोलीस शिपाई विनय मोहोड, सुभाष पाटील, इम्रान, महादेव, संतोष, चालक राजेश बैरठ यांनी गुप्त माहितीवरून पुसदा येथे धाड टाकली असता आरोपी अतुल रामकृष्ण हरडे, गणेश संपत झाकर्डे व संतोष किसन घुगुलामाने (सर्व राहणार शिराळा) यांच्याकडून तब्बल १ लाख १० हजारांचा दारूसह मुद्देमाल जप्त केला. तिन्ही आरोपींना वलगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
शहरात अवैध दारूविक्रीला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2017 12:15 AM