रस्त्यांची चाळण, महसूल विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
तळेगाव दशासर : परिसरातील नदी-नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरू करण्यात आला आहे. धामणगाव तालुक्यातील रेतीघाटांचा अद्याप लीलाव झालेला नाही. त्यामुळे बांधकामासाठी मिळेल त्या दराने खरेदी होत असल्याने रेती तस्करी जोमात सुरू आहे.
तळेगाव येथील घुईखेड रोडवरील घुटकी नाला, मोतीकोळसा नदी व निंभापूर शिवारातील नाल्यामधून दिवस-रात्र बैलबंडीच्या साहाय्याने राजरोस रेती उपसा केला जात आहे. दररोज १५ ते २० बैलबंडीचा यासाठी वापर केला जातो. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. सोबतच रस्त्याची चाळण होत आहे. गावातील जुनी सोसायटी मार्गे व हायवेवरून बस स्टँड मार्गे या बैलगाड्या रेती घेऊन गावात शिरतात. त्याकडे महसूल विभागाने व पोलीस विभागाने दुर्लक्ष चालविले आहे. नदीपात्रात मोठा डोह तयार होण्याची भीती आहे, शिवाय पर्यावरणीय हानीदेखील मोठी आहे.
सदर शासकीय इमारती बांधण्याकरिता कंत्राटदारांच्या मागणीने जास्त दरात रेतीची मागणी होत असल्याने रेती तस्कर कोणालाही न जुमानता यांना रेती पुरविली जात आहे. याबाबत याआधी गावातील नागरिकांनी अनेकदा निवेदन दिलेले असले तरी याबाबत संबंधित विभाग उदासीन असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.