भाजप ची तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी
भाजपची मागणी : चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गोरखधंदा
चांदुर बाजार : तालुक्यात अवैध दारू तस्करी व अवैध दारू विक्री पूर्णतः बंद करून संबंधित यंत्रणेला निर्देशित करून त्वरित उपाययोजना करण्याबाबत भारतीय जनता पार्टीतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील ४ पोलीस ठाण्यांअंतर्गत येणाऱ्या सर्वच गावागावांत अवैध दारू तस्करी व विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे गावागावात गुंडगिरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सामान्य नागरिकांनी जर अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध आवाज उठवला तर दारू तस्कर गुंडगिरी करून शस्त्राचा धाक दाखवून मारपीट करण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. गल्लीगल्लीत राजरोसपणे दारू विक्रेत्यांना दारू तस्कर घरपोच दारू पोहोचवित आहेत. ही दारू चांदुर बाजार हद्दीतील सर्वच छोट्या मोठ्या गावात पोहोचत आहे. प्रत्येक गावात अवैध दारू सहज उपलब्ध झाल्याने दारुच्या व्यसनात मोठी वाढ झालेली दिसून येते.
त्याचा वाईट परिणाम लहान मुलांच्या भविष्यावर व महिलांवर होत आहे. अवैध दारू विक्री व तस्करीच्या व्यवसायातून गुन्हेगारीचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे. अशात चांदुर बाजार शहरातील माळीपुरा परिसरात काही दिवसांआधी एका युवकावर दारू व्यवसायातून प्राणघातक हल्लासुद्धा झाला होता. तशी तक्रार दारू विक्रेत्यासह पाच जणांविरुद्ध जखमीने दिली होती. यामुळे माळीपुरा परिसरातील महिलांनी दारू विक्रेत्याविरुद्ध आवाज उठवला असता दारू तस्कर खुलेआम तलवार घेऊन त्या परिसरात दहशत पसरवित आहे. या प्रकरणाची माहिती नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी चांदुर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी नरेंद्र पेंदूर यांना दिली होती. मात्र, त्याविरुद्ध कोणतीही कार्यवाही न केल्याने पोलीस प्रशासनाविरुद्ध सामान्य जनतेत आक्रोश निर्माण झाला आहे.
चांदुर बाजार शहरातून दारुची होणारी तस्करी व वाहतूक याविरुद्ध चांदुर बाजार पोलिसांतर्फे कोणतीही कारवाई केली नसल्याने जाणीवपूर्वक दारू तस्करांचे धाडस वाढलेले आहे. या अवैध दारू तस्करी व विक्रीवर कायमस्वरूपी आळा घालण्याकरिता तालुका भाजपतर्फे वारंवार चांदुर बाजारचे ठाणेदार यांना विनंती केल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. या सर्व प्रकाराला त्यांचे अभय असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप तालुका भाजपतर्फे तहसीलदार धीरज स्तुल यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे दारू तस्करी व अवैध दारू विक्री व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याकरिता संबंधित प्रशासकीय विभागाला माहिती देऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मुरली माकोडे, उपाध्यक्ष सुमित निंभोरकर, तालुका सरचिटणीस गोपाल तिरमारे, शहर सरचिटणीस राज चव्हाण, अमन सोळंके, आकाश सूर्यवंशी, जय यावले, निखिल वांगे, प्रमोद वासणकर यांच्या उपस्थितीत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.