लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आरटीओ कार्यालयासमोर ऑनलाईन अर्ज भरुन देणारी वाहने अनेक वर्षांपासून नियमबाह्य पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या वाहनचालकांवर शहर वाहतूक पोलीस केव्हा कारवाई करणार? असा प्रश्न विचारला जात आहे. सामान्य नागरिकांनी शहरात नो-पार्किंग झोनमध्ये दुचाकी पार्क केली किंवा शहरातील मुख्य मार्गावर कुठेही दुचाकी ठेवली तर वाहतूक पोेलिसांची वाहने तेथे येऊन ती दुचाकी उचलून घेऊन जातात. अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईसुद्धा केली जाते. अशा शेकडो वाहनांवर शहरात रोज कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. मात्र, आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर एजंटांनी आपला व्यवसाय थाटला आहे. कुठल्याही कामाचे ते हजारो रुपये घेऊन काम करून देतात. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी किंवा पीयुसी काढून देण्याकरिता किंवा आरटीओचे कुठलेही काम करून देण्याकरिता येथे रस्त्यावर वाहने ठेवली जातात. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या अन्य वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. एजंटांनी स्वत:चे दुकान घेऊन आपला व्यवसाय करणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून रस्त्यावरच व्यवसाय केला जातो. रस्ते सामान्य नागरिकांच्या वाहतुकीकरिता आहेत की, आरटीओत कामे करून देऊन लाखो रुपये कमावणाऱ्या एजंटांकरिता आहेत? असा प्रश्न आता अमरावतीकर विचारत आहेत. याकडे वाहतूक पोलीस व महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे दुर्लक्ष होत आहेत.
बॉक्स :
आरटीओत पुन्हा लागली वाहने
आरटीओच्या आतील परिसरात ऑनलाईन अर्ज भरुन देणारे किंवा आरटीओतील कुठेलेही काम जादा पैसे घेऊन करून देणाऱ्या एजटांच्या ओमनी कार प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गीते यांच्या आदेशाने आरटीओ व मोटर वाहन निरीक्षकांनी आरटीओच्या बाहेर काढल्या होत्या. दोन ते तीन दिवस कुणीही आरटीओच्या आतील परिसरात वाहने लावली नाहीत. मात्र, आता पुन्हा परिस्थिती जैसे-थे होत आहे. आरटीओच्या परिसरात झाडाखाली किंवा काही अंतरावर काही व्यावसायिकांनी वाहने ठेवून पुन्हा व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे कायमस्वरूपी कारवाई अपेक्षित आहेत.