मनीष तसरे
अमरावती: ३१ डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतासाठी शासनाने मद्य विक्री परवाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र, यानिमित्त अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतूक व साठवणूक होऊ नये, याकरिता तसेच राज्यात विक्रीस बंदी असलेल्या त्याचप्रमाणे बनावट मद्याची तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. त्याकरिता तीन गस्ती पथकाची निर्मिती करण्यात आली असून त्याव्दारे रात्रीची गस्त, नाकाबंदी करून वाहन तपासणी, संशयित धाब्याची तपासणी केली जात असल्याची माहिती अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांनी दिली.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ठिकठिकाणी मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यादृष्टीने उत्पादन शुल्क विभागाचा एक दिवसीय परवाना न घेता अवैध पार्ट्या नियोजित करण्याची शक्यता लक्षात घेता अशा पार्ट्यांवर विशेष लक्ष ठेवून कारवाई करण्यात येणार आहे. बार आणि परमीट रूमचा परवाना नसलेल्या हॉटेल व धाब्यावर अवैधरीत्या मद्यविक्री आढळून आल्यास महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४५ अंतर्गत ६८ व ८४ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.