गोपाल तिरमारे, जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी
चांदूर बाजार : तालुक्यातील बोर्डी नाला प्रकल्पस्थळी सुरू असलेल्या कामात मुरुमाचे अवैध उत्खनन व डंपरने नियमबाह्य वाहतूक होत असल्याचा आरोप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी जिल्हाधिऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या कामात मोठ्या प्रमाणात महसूल बुडवून शासनाचे आर्थिक नुकसान होत असल्याचे तिरमारे यांनी तक्रारीत म्हटले. याप्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याप्रकरणी दिलेल्या निवेदनानुसार, चांदूर बाजार तालुक्यातील बोरगाव येथील बोर्डी नाला सिंचन प्रकल्पाचे बांधकाम एस.एन. ठक्कर कंपनीकडून व्ही.यू.व्ही. कंपनीकडे देण्यात आले. धरणाच्या बांधकामाकरिता एकूण १.५० लक्ष ब्रास मुरुमाची आवश्यकता असून, या ठिकाणी आतापर्यंत अंदाजे ३० ते ४० हजार ब्रास मुरुम वापरण्यात आलेला आहे. त्याकरिता लागणारा मुरुम हा दोन महिन्यांपासून चांदूर बाजार तालुक्यातील पाळा येथून शिरजगाव कसबा, ब्राम्हणवाडा थडी, चांदूर बाजार मार्गे तळेगाव मोहना येथे डंपर व ट्रकने पुरविला जात आहे. पाळा येथून मुरुमाची ही एका रॉयल्टी पासवर तीन ते चार ट्रीप वाहतूक केली जात असल्याचा आरोप तिरमारे यांनी तक्रारीत केला आहे.
गौण खानिजाची वाहनातील भारमर्यादा पाच ब्रासची असताना, सात ते आठ ब्रास मुरुमाची ओव्हरलोड वाहतूक रस्त्याने केली जात आहे. याद्वारे शासनाचा महसूल बुडविला जात असल्याचा आरोप गोपाल तिरमारे यांनी केला. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या १४/६/२०१७ च्या परिपत्रकानुसार गौणखनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरिता करावयाच्या उपाययोजना ठरवून दिलेल्या आहेत. त्यानुसार प्रभावी कारवाई करण्याच्या दृष्टीने शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा खानिकर्म अधिकारी यांची समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने प्रकरणाची सखोल चौकशी वकायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी तसेच चांदूर बाजार तहसीलदारांकडे केली आहे.