जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : तीन वर्षांपूर्वी केली बोअरवेलसुरेश सवळे चांदूरबाजारस्थानिक बेलोरा रस्त्यानजीक नगरपरिषद हद्दीतील ले-आऊटमधील मैदानाच्या राखीव जागेवर मागील तीन वर्षांपासून अवैध अतिक्रमण करण्यात आले आहे. या खुल्या जागातील जमीन अवैधरीत्या बोअरवेल उभारून त्याचा वापर व्यवसायाकरिता करण्यात येत आहे. याला स्थानिक ड्रिमलँड कालनीमधील रहिवासी यांनी विरोध केला असता ह्या अतिक्रमण धारकांनी त्यांनाच धमकावण्याचा प्रकार घडल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली असून कारवाईची मागणी केली आहे. चांदूरबाजार नगरपरिषद हद्दीत शेत स. नं. ८०/२ मध्ये ले-आऊट प्लॉट पाडण्यात आले. आता त्याठिकाणी ड्रिमलँड कॉलनी उभारण्यात आली आहे. यात लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानाची जागा राखीव ठेवण्यात आली होती. त्या मोकळ्या जागेवर अ. कलाम शे. उस्मान व नाजीम परवेज अ. कलाम या बापलेकांनी अवैध अतिक्रमण करून या जागेचा वापर बोअरवेल मशीन व वाहने ठेवण्यासाठी केला आहे. इतकेच नव्हे तर या मैदानाच्या जागेत बोअरवेल खोदली आहे. यातील पाण्याचा वापर हे बाप-लेक खताच्या व्यवसायासाठी करीत असून यातील पाणी कॉलनीतील रहिवाशांना सुद्धा घेऊ देत नाही. रहिवाशांनी पाणी नेण्याचा प्रयत्न केला असता बाप-लेक स्थानिक नागरिक व लहान मुलांना हाकलून लावतात व शिवीगाळ करून मारण्याच्या धमक्या देतात, असा आरोप फिरोज अहेमद अ. सत्तार यांनी केला असून कारवाईची मागणी केली आहे. मागील तीन वर्षांपासून या बाप-लेकांनी या मोकळ्या मैदानावरील बगिचाच्या जागेवर ताबा चढविला असून यात ट्रक, कार, ट्रॅक्टर व इतर वाहने ठेवण्याकरिता वापर करीत आहेत. इतकेच नव्हे, तर या जागेच्या चारही बाजूला तार कंपाऊंड करून मोठे फाटक लावण्यात आले आहे व त्याला कुलूप ठोकण्यात आले आहे. या जागेत असलेल्या बोअरवेलचे पाणी घेण्याच्या मोबदल्यात पैशाची मागणी करीत असल्याचाही आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. हे अवैध अतिक्रमण त्वरित हटविण्यात येऊन कायदेशीर कारवाईची मागणी फिरोज अहेमद यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार व मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
मैदानाच्या राखीव जागेवर अवैध ताबा
By admin | Published: October 30, 2015 12:31 AM