राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस कोमात
तळेगाव दशासर : स्थानिक पोलीस ठाण्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे अवैध धंद्यांना अक्षरशः पूर आल्याचे वास्तव्य आहे. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष ‘अर्थपूर्ण’ असल्याची गावात चर्चा होत आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे.
परवानाधारक देशी दारूची दुकाने गावाबाहेर गेल्याने अवैध दारूविक्रेत्यांना त्याचा चांगलाच फायदा होत आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत खुलेआम कामगार व युवकांना दारूचे व्यसन जडले आहे. दारूला ग्राहकी चांगली असल्यामुळे तसेच आर्थिक उत्पन्नही मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे अनेक व्यक्तींनी या व्यवसायात उडी घेतली आहे. मद्यपी मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिला, कामगार, विद्यार्थी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. महिला व मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न दारूडे करतात. तक्रार देण्यास कुणी पुढे येत नसल्यामुळे मद्यपींचा त्रास वाढला आहे. कामगार व युवक दारूच्या व्यसनात गुरफटल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. व्यसन जडलेल्यांच्या घरात भांडणाचे प्रकार वाढले असून, दारूची चोरटी विक्री थांबविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. जेमतेम रोजंदारी करून आलेले मजुरी कामगार दारूवर खर्च करीत आहेत.
दारूविक्री करणार्यांची दहशत असल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास सर्वसामान्य नागरिक धजावत नाही. यामुळे दारूविक्रीचा हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे, शिवाय अनेक हॉटेल, रात्री उशिरापर्यंत दारूची विक्री करण्यात येते. दारूविक्रेत्यांकडून ‘मलिदा’ मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ज्या ठिकाणी पोलिसांची वर्दळ असते. त्याही ठिकाणी दारू विक्री होत असल्याची माहिती असून सुद्धा त्याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकारावर स्थानिक पोलीस कारवाई करणार का, असा सूर जनमानसातून व्यक्त होत आहे.